बाल्कनी आणि  इमारतीच्या छतावर वृक्षवल्ली आम्हा सोयरी...; पालिकेचा ग्रीनिंग मुंबई उपक्रम

By जयंत होवाळ | Published: December 18, 2023 07:05 PM2023-12-18T19:05:44+5:302023-12-18T19:05:58+5:30

मुंबईकरांच्या घराची बाल्कनी, इमारतींचे छत , गृहनिर्माण संस्थांचे आवार हिरवेगार करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

Vriksavalli Amha Soyri on the balcony and roof of the building Municipality's Greening Mumbai initiative | बाल्कनी आणि  इमारतीच्या छतावर वृक्षवल्ली आम्हा सोयरी...; पालिकेचा ग्रीनिंग मुंबई उपक्रम

प्रतिकात्मक फोटो


मुंबई : मुंबईकरांच्या घराची बाल्कनी, इमारतींचे छत , गृहनिर्माण संस्थांचे आवार हिरवेगार करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात या या ठिकाणांवर हिरवीगार झाडे डोलताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. ‘ग्रीनिंग मुंबई’ ही  माहिती पुस्तिका मुंबईकरांना याकामी पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देईल.

मुंबईतील घरांची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार, लहान लहान बगीचे आदी ठिकाणी कमीत कमी जागेत विविध प्रकारची रोपटी, झाडे, फुल-फळ झाडे कशी लावावीत, यासाठी  महानगरपालिकेने 'डब्ल्यूआरआय इंडिया' या संस्थेच्या सहकार्याने ‘ग्रीनिंग मुंबई’ ही  मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.  

या पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप अधीक्षक (वृक्ष प्राधिकरण)ज्ञानदेव मुंडे, 'डब्ल्यूआरआय इंडिया'च्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, ‘ओइकोस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस आणि ट्रान्सफॉर्मिंग’च्या कीर्ति वाणी, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या अविनाश कौर आदी उपस्थित होते.        

मुंबई महानगरात वृक्षवल्ली अधिकाधिक बहरावी आणि त्या निमित्ताने पर्यावरण संतुलन टिकून राहावे, यासाठी महानगरपालिका अनेक उपक्रम हाती घेत असते. मुंबईत मुळातच जागेची कमतरता असल्याने येथे उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नातून महानगरपालिकेने 'ग्रीनिंग मुंबई' ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेत पर्यावरणविषयक शास्त्रीय माहिती आहे. वृक्षारोपण करताना या माहितीचा फायदा मुंबईकरांना  नक्कीच होईल. त्यातील माहिती वाचून व अभ्यासून पर्यावरणविषयक जागरुक असलेल्या मुंबईकरांनादेखील यात आपली मते नोंदविता येणार आहेत. नागरिकांची मते प्राप्त झाल्यानंतर,  योग्य आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येतील, अशा सुचनांचा किंवा पर्यायांचाही पुस्तिकेत समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईकरांनी  १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत आपले मत नोंदवावे, असे आवाहन भिडे यांनी या निमित्ताने केले.

- असे नोंदवा आपले मत
या माहिती पुस्तिकेची ऑनलाईन लिंक http://surl.li/ojnfk असून, माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करता येऊ शकते. त्यातील पृष्ठ क्रमांक चार वरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर  मुंबईकर या पुस्तिकेबाबत आपली मते नोंदवू शकतात. अंतिम सुचनांचा समावेश करुन दिनांक  ८ मार्च २०२४ रोजी या पुस्तिकेची सर्व समावेशक आवृत्ती उपलब्ध करुन देण्यात येईल.

Web Title: Vriksavalli Amha Soyri on the balcony and roof of the building Municipality's Greening Mumbai initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.