वि. श्री. जोशी यांच्यामुळे क्रांतिकारकांचा इतिहास लोकांपुढे आला - क्रांतिगीता महाबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:06 AM2021-08-22T04:06:03+5:302021-08-22T04:06:03+5:30
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी कष्ट सहन केले, तुरुंगवास भोगला, प्राणांची आहुती दिली होती. मात्र त्याची नोंद कुठेही ...
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी कष्ट सहन केले, तुरुंगवास भोगला, प्राणांची आहुती दिली होती. मात्र त्याची नोंद कुठेही नव्हती. देशाला स्वातंत्र्य रक्त न सांडता मिळाले आहे, असे अतिशय चुकीचे सांगितले गेल्यामुळे क्रांतिकारक कोणालाही आठवले नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. या सर्व पार्श्वभूमीवर क्रांतिकारकांचे चरित्रकार वि. श्री. जोशी यांच्यामुळे क्रांतिकारकांची ती नोंद व माहिती आज आपल्याला मिळू शकली. क्रांतिकारकांबाबत लिहिणे पाप आहे, असा चुकीचा विचार तेव्हा केला जात होता. त्या काळात त्यांनी क्रांतिकारकांचा इतिहास लिहिला आहे. हीच वि. श्री. जोशी यांची थोरवी आहे, असे प्रतिपादन क्रांतिगीता महाबळ यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने क्रांतिकारकांचे चरित्रकार विष्णु श्रीधर जोशी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. शुक्रवारी जोशी यांच्या जयंतीदिनी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाबळ यांनी सांगितले की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र १९४७ मध्ये प्रथम वि. श्री. जोशी यांनी लिहिले. फडके यांचे अस्तित्व लोकांपर्यंत आणण्यासाठी त्यांनी पोलीस नोंदी, क्रांतिकारकांच्या नातेवाइकांच्या-निकटवर्तींच्या आठवणी, खटल्यांची कागदपत्रे, वासुदेव बळवंत फडके यांच्या संबंधात एडनशी केलेला पत्रव्यवहार अशी प्रत्येक ग्रंथासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. आणि खरा वस्तुनिष्ठ इतिहास मांडला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ग्रंथाला पुरस्कारही दिला होता.
सावरकर स्मारकाने १९९०-९१ च्या दरम्यान अंदमानात शिक्षा भोगलेल्या आणि त्यावेळी जिवंत असलेल्या अनेक क्रांतिकारकांशी संपर्क साधून त्यांचा सत्कार घडवला होता. त्यामागेही वि. श्री. जोशी यांचे काम मोलाचे होते. सत्य इतिहास लोकांपुढे आणायचे त्यांचे उद्दिष्ट होते. जी माणसे इतिहास विसरतात त्यांचा भविष्यकाळ अंधारात जातो. यासाठीच इतिहास समजून घेऊन त्यातून शहाणे झाले पाहिजे, हीच त्यांची इच्छा होती. नव्या पिढीने त्यांची ही इच्छा पूर्ण करायला हवी. असे महाबळ यांनी सांगितले.