Join us

मुंबईतून गिधाडे झाली हद्दपार; १९२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 3:16 AM

मुंबई शहर व उपनगरात नुकतेच पक्षी निरीक्षण करण्यात आले. 

- सागर नेवरेकर मुंबई : मुंबई शहर व उपनगरात नुकतेच पक्षी निरीक्षण करण्यात आले. यामध्ये चार पक्ष्यांची नोंद झालीच नाही. यात प्रामुख्याने गिधाड पक्षीप्रेमींना दिसले नाही. गेल्या वर्षीही गिधाड दिसले नसल्याची नोंद झाली़ वाढते शहरीकरण, विविध विकासकामे, कमी उंचीची झाडे, यामुळेच गिधाड मुंबईतून हद्दपार झाल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. यासोबतच रानकोंबडी, लावा, तित्तिर हे पक्षीदेखील मुंबईकरांना भविष्यात दिसणार नाहीत. कारण त्यांचीही नोंद या पक्षी निरीक्षणात झालेली नाही.

‘बर्ड रेस’ अभियानांतर्गत मुंबई महानगर प्रदेशासह वसई-विरार, अलिबाग आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या पूर्वेकडील पायथ्यापर्यंतच्या नैसर्गिक अधिवासात पक्षीप्रेमींनी नुकतेच पक्षी निरीक्षण केले. या वेळी पक्षी निरीक्षकांनी व पक्षीप्रेमींनी १९२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली. या निरीक्षणामध्ये एकूण ३०० पक्षीप्रेमींनी सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे ६० वेगवेगळे ग्रुप करण्यात आले होते. हे ग्रुप विविध ठिकाणी जाऊन पक्ष्यांच्या नोंदी ठेवत होते. पक्षी निरीक्षक व अभ्यासक संजय मोंगा व रवी वैद्यनाथन यांनी या ‘बर्ड रेस’चे आयोजन केले होते.

जंगल, मोकळे मैदान, पाणथळ जागा, शहर आणि शहरी किनारपट्टी इत्यादी ठिकाणांहून पक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवण्यात आल्या होत्या. १९२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून सर्व वर्षांचा आढावा घेतला, तर आतापर्यंत २४० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या विकासकामांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला असून पक्ष्यांनी घर बदलले, अशी खंत पक्षिप्रेमींनी व्यक्त केली.गिधाड, लावा, तित्तिर आणि रानकोंबडी हे पक्षी आढळून आले नाहीत.

तसेच चार प्रजातींचे सुतार पक्षी, दोन प्रजातींचे लाल चकोत्री पक्षी, तीन प्रजातींचे धोबी पक्षी, १८ प्रजातींचे शिकारी पक्षी आणि ६३ प्रजातींचे पाणथळावरील पक्षी आढळून आले; तसेच भारतीय निळा दयाळ, काळा गरुड, तपकिरी छातीची माशीमार, पांढुरका भोवत्या, काळा थिरथिरा, रान धोबी इत्यादी पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

पक्षी निरीक्षक संजय मोंगा हे वर्षानुवर्षे पक्षी निरीक्षणाची परंपरा पुढे नेत आहेत. यंदा ‘बर्ड रेस’चे सोळावे वर्ष होते. पाणथळ, वनक्षेत्र, गवताळ जमीन, शहरी भाग इत्यादी ठिकाणांहून पक्ष्यांचा अधिवास हळूहळू कमी होताना दिसून आला. सतत पक्ष्यांच्या प्रमाणात घसरण होत असल्याचे निरीक्षणादरम्यान जाणवले. - कुणाल मुनसिफ, पक्षी निरीक्षक

टॅग्स :पर्यावरणमुंबईमहाराष्ट्र