मुंबई : मुंबई, ठाणे, नवीमुंबई याठिकाणी सुरू असलेली विकास कामे याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हा पक्ष्यांच्या राहणीमानावर दिसून येतो. शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने पक्षी कमी प्रमाणात शहरी भागात येतात. गिधाड, लावा, रानकोंबडी हे पक्षी निरीक्षणादरम्यान दिसून आले नाहीत. तर तीरचिमणी/चरचरी, धोबी पक्षी तुरळक प्रमाणात दिसले. चंडोळ हा पक्षी मुंबईच्या बाहेर आढळल्याने पक्षिप्रेमींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.वसई, बोरीवली, शिवडी, भांडूप येथील नैसर्गिक अधिवासात पक्ष्यांचा वावर असून ‘मुंबई बर्डरेस’ अभियानांतर्गत नुकतेच पक्षी निरीक्षण मोहिम राबविण्यात आली. यावेळी ३७८ पक्षिप्रेमींनी सहभाग घेतला होता. पक्षी निरीक्षणातून २३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विरार, वसईतील तुंगारेश्वर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, शिवडी (फ्लेमिंगो पॉइंट), भांडूप, तानसा, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग, माथेरान इत्यादी ठिकाणी पक्षी निरीक्षण केले गेले.सागरी किनारी आणि पाणथळ क्षेत्रात पक्ष्यांच्या ८६ प्रजाती, जंगल भागात ७५ प्रजाती, गवताळ परिसरात ६४ प्रजाती आणि शहरी भागात ९० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेषत: पक्षी निरीक्षणामध्ये ४० विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. पक्षी निरीक्षणामध्ये सुरमा हळद्या, काळा गरूड आणि भारतीय निळा दयाळ हे पक्षी प्रामुख्याने आढळून आले. तुंगारेश्वरच्या जंगलामध्ये पिवळा रामगंगा हा पक्षी दिसून आला. तसेच ‘सुरमा हळद्या’ हा यंदाच्या ‘बर्ड आॅफ दी डे २०१९’ चा मानकरी ठरला आहे. पक्षी निरीक्षणामध्ये वटवट्या पक्ष्यांच्या १४ प्रजाती, कोतवाल ५ प्रजाती, ढोकरी/बगळा ३२ प्रजाती, कुरव/सुरया १२ प्रजाती आणि गप्पीदास/कस्तुर ९ प्रजाती पक्षिप्रेमींना आढळले.पाणथळ आणि गवताळ भागातील पक्ष्यांचा अधिवास कमी होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये विकासकामे सुरू असून त्यांचा सर्वात मोठा परिणाम पक्ष्यांच्या राहणीमानावर होताय. माथेरान हा जंगल भाग आहे. अलिबाग हा सागरी किनाऱ्यांचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अधिवासाबाबत वेगवेगळ््या गोष्टी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास चांगला तर काही ठिकाणी वाईट अवस्था निदर्शनास आली. महत्त्वाचे म्हणजे प्रदुषणाचा मोठा परिणाम पक्ष्यांवर झालेला आहे. - संयोज मोंगा, पक्षी अभ्यासकमुंबईच्या विकासासाठी जे विकास प्रकल्प सुरु आहेत. याचा परिणाम हा पक्ष्यांच्या अधिवासावर होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पूर्वी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा अधिवास होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उरण याठिकाणी पक्ष्यांचा वावर कमीझाला आहे. - कुणाल मुनसिफ, पक्षी निरीक्षक
गिधाड, रानकोंबडी हद्दपार; चिमणी, चरचरी धोबी अल्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 5:11 AM