मुंबई : व्हीव्हीपॅट मशीन दोषविरहित असावी व तिचे कार्य अधिक पारदर्शक पद्धतीने असावे, यासाठी निवडणूक आयोगाला आवश्यक ते निर्देश द्यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.मुंबईचे रहिवासी प्रशांत यादव यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यादव यांच्या म्हणण्यानुसार, व्हीव्हीपॅट मशीनचे उत्पादन करताना अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर अपलोड करताना आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात राजकीय पक्षांचे अधिकृत निवडणूक चिन्ह अपलोड करताना मानवी हस्तक्षेप करण्यात येतो. मशीनमधील दोष कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून निडवणूक आयोगाला अनेक सूचना केल्या आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही, असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावत याचिकाकर्त्यांना पुढील सुनावणीत सूचनांची यादी आयोगाला देण्याचे निर्देश दिले. मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केलेल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाची प्रत व्हीव्हीपॅट मशीनद्वारे देण्यात येणार आहे. मतदान अधिक पारदर्शक पद्धतीने पार पाडावे यासाठी निवडणूक आयोगाने या मशीनची निर्मिती केली.
व्हीव्हीपॅट मशीन दोषविरहित करा; जनहित याचिकेद्वारे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 5:22 AM