Join us

विलेपार्ल्याचा गणेशोत्सव जपतोय सामाजिक वसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 2:17 AM

विलेपार्ले पूर्वेकडील विलेपार्लेचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ आणि सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ही मंडळे अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वसा जपत आहेत.

मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील विलेपार्लेचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ आणि सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ही मंडळे अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वसा जपत आहेत.विलेपार्ले पूर्वेकडील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथील ‘विलेपार्लेचा राजा’ या गणेश मंडळाचे यंदा ४९ वे वर्ष आहे. मंडळाकडून दरवर्षी अन्नदान केले जाते. या वर्षी साडेतीन ते पाच हजार नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. पूजेनिमित्त परिसरातील दोन कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके मोफत धान्य देण्यात आले. मंडळ पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असून त्यानिमित्ताने वर्षभरात ५० सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम हाती घेणार आहे. याची सुुरुवात काही दिवसांपूर्वीच आरोग्य शिबिर घेऊन करण्यात आली आहे, अशी माहिती विलेपार्लेचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील गंडे यांनी दिली. विलेपार्ले पूर्वेकडील शिवाजीनगर येथील ब्रह्मानंद सोसायटीमध्ये गेल्या १७ वर्षांपासून श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव सण साजरा करत आहे. सणासोबत हे मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. शैक्षणिक साहित्य, कपडे आणि धान्यवाटप हे कार्यक्रम राबविले जातात. शाळेतील मुलांना एका वही-पेनसाठी शाळेला मुकावे लागते. अशा शाळांना भेटी देऊन मंडळाकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. यंदा रत्नागिरीमधील श्री कनकादित्य मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाच्या स्थापनेपासून १६ इंचाची गणेशमूर्ती आजतागायत कायमस्वरूपी विराजमान आहे, अशी माहिती श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर गीते यांनी दिली. सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६४ वे वर्ष आहे. मंडळाकडून एक रुग्णवाहिका आणि एक शववाहिनी वर्षभर मोफत सेवा पुरविते. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमासोबत गरीब व गरजू कुटुंबांना वैद्यकीय खर्च मंडळाच्या वतीने दिला जातो. मुलींना शिकवा असा संदेश मूषकराज भक्तांना देत आहे, अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र गुलाब जोशी यांनी दिली.

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी २०१८