वडाळा, मानखुर्द संक्रमण शिबिराचा मुद्दा पेटला!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:32 AM2017-08-12T06:32:55+5:302017-08-12T06:32:55+5:30

वडाळा आणि मानखुर्द येथील संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या ४ हजार ६०० रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत, आठवड्याभरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहे.

 Wadala, Mankhurd transit camp raises issue! | वडाळा, मानखुर्द संक्रमण शिबिराचा मुद्दा पेटला!  

वडाळा, मानखुर्द संक्रमण शिबिराचा मुद्दा पेटला!  

Next

मुंबई : वडाळा आणि मानखुर्द येथील संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या ४ हजार ६०० रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत, आठवड्याभरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहे. वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाने गुरुवारी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनानंतर पाटील यांनी हे आश्वासन दिले आहे.
संघाचे अध्यक्ष राजीव कदम यांनी सांगितले की, एमएमआरडीएने दिलेल्या पत्रानुसार, मुंबईत १९ हजार ८४४ सदनिका रिक्त आहेत. त्यामध्ये मानखुर्द व वडाळा येथील संक्रमण शिबिरांतील ४ हजार ६०० रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी सेवा संघाने केली आहे. रिक्त घरांत रहिवाशांचे पुनर्वसन झाल्यानंतर, वडाळा आणि मानखुर्द येथील संक्रमण शिबिराचा मोठा भूखंड शासनाकडे सुपुर्द होईल, तसेच संक्रमण शिबिरांतील घरांचा प्रश्नही तातडीने निकाली लागेल. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी आठवड्याभरात महापालिका आयुक्त आणि एमएमआरडीए प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासित केले आहे.
या बैठकीत शहरी बेघरांचा प्रश्नही उपस्थित करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. ते म्हणाले की, बेघरांचा प्रश्नही उग्र रूप धारण करत असून, महापालिकेंतर्गत त्यासाठी स्थायी आश्रम योजना तयार करण्याची मागणी केली आहे. त्यातही मानसिक आणि अपंग बेघरांसाठी विशेष स्थायी आश्रयाची श्रेणी तयार करण्याचे आवाहन पाटील यांना केले आहे. या आधी नगरविकास राज्यमंत्र्यांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी प्रशासनासह मुंबई महापालिका आयुक्तांना या संबंधात दिशानिर्देश केले होते. मात्र, अद्याप अंमलबजावणीअभावी कार्यवाही शून्य झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नगरविकास विभागानेही कार्यप्रणालीवर दीड महिन्यांत पुन्हा बैठक घेऊन, कार्याचा आढावा घेण्याचे आश्वासित केले होते. मात्र, एक वर्ष उलटल्यानंतरही प्रशासनाला बैठकीसाठी मुहूर्त मिळालेला नव्हता.

Web Title:  Wadala, Mankhurd transit camp raises issue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.