वडाळा पोलिसांचा निष्काळजीपणा भोवला

By admin | Published: April 10, 2016 03:06 AM2016-04-10T03:06:20+5:302016-04-10T03:06:20+5:30

दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वडाळा पोलिसांचादेखील निष्काळजीपणा समोर आला आहे. दोन्ही मुले रात्री घरी न आल्यामुळे

Wadala police negligence | वडाळा पोलिसांचा निष्काळजीपणा भोवला

वडाळा पोलिसांचा निष्काळजीपणा भोवला

Next

नवी मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाशी खाडीपुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वडाळा पोलिसांचादेखील निष्काळजीपणा समोर आला आहे. दोन्ही मुले रात्री घरी न आल्यामुळे त्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु या वेळी पोलिसांनी ही बाब गांभीर्याने न घेता तक्रार करण्यासाठी आलेल्या पालकांची तक्रार नाकारून त्यांना घरी पाठवले होते. अखेर दुसऱ्या दिवशी मुलाच्या शोधात वडीलच सर्व रुग्णालयांमध्ये चौकशी करीत असताना वाशी पोलिसांच्या ताब्यातील ऋतिकच्या मृतदेहाची ओळख पटली.
वडाळा येथे राहणाऱ्या दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकारात निखिल गड्डम (१६) बचावला असून, त्याचाच मित्र ऋतिक पटेकरचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे त्यांच्या दोन मैत्रिणींसोबत राहत्या परिसरातीलच निर्जन ठिकाणी सिगारेट ओढत बसले असताना एका व्यक्तीने त्यांना हटकले. शिवाय त्यांच्याकडील मोबाइल ताब्यात घेऊन पोलिसांची भीती दाखवून पैशाची मागणी केली. पैशाची सोय न झाल्याने सदर व्यक्ती आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देईल व घरच्यांपर्यंत हे प्रकरण पोचेल, या भीतीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची कबुली निखिलने वाशी पोलिसांना दिली आहे. ऋतिकच्या शोधात त्याचे वडील गणेश पटेकर हे सर्व रुग्णालयांमध्ये चौकशी करीत असताना त्यांनी वाशीतील पालिका रुग्णालयातही संपर्क साधला. यावेळी त्यांनी वाशी पोलिसांशी संपर्क साधून सदर मृतदेहाची पाहणी केली असता, तो ऋतिकचा मृतदेह असल्याचे उघड झाले. मात्र दोन्ही घटनांमधील मुले वडाळ्याची असल्यामुळे पोलिसांनी पुन्हा निखिलची चौकशी केली असता त्याने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)

ऋतिकसोबत घातपात घडल्याची शक्यता व्यक्त होत असली तरीही शवविच्छेदन अहवालात तसे काही निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. निखिलने बर्थडे पार्टीसाठीच त्यांना बोलावले होते. यानंतर त्यांच्यात नक्की काय झाले व त्यांच्याकडील मोबाइल घेणारी व्यक्ती कोण, याचा उलगडा होण्याची गरजही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
शिवाय वडाळा पोलिसांनी कुटुंबीयांची तक्रार नोंदवून दोघांनाही शोधण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. तसेच ज्या व्यक्तीने मुलांकडून मोबाइल घेतले, ती व्यक्ती पोलीस ठाण्यात मोबाइल जमा करतेवेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Wadala police negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.