वडाळ्यातील रस्ते खड्डे‘ग्रस्त’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 01:42 AM2018-07-15T01:42:00+5:302018-07-15T01:46:24+5:30

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ हजार कोटी खर्च केले. तरीही दरवर्षी पावसात रस्त्यांची चाळण होतेच आहे.

Wadala road paved with | वडाळ्यातील रस्ते खड्डे‘ग्रस्त’

वडाळ्यातील रस्ते खड्डे‘ग्रस्त’

- अजय परचुरे 

मुंबई : मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ हजार कोटी खर्च केले. तरीही दरवर्षी पावसात रस्त्यांची चाळण होतेच आहे. गेल्या वर्षी खड्ड्यांवरून पालिका आणि राज्य शासनाला बरीच टीका सहन करावी लागली होती. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच बऱ्याच रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र, मुसळधार पावसाने या खड्ड्यांवर लावलेला ‘मुलामा’ धुऊन नेला. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच मुंबईत खड्डेमय रस्त्यांचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईची ही स्थिती पालिका आणि राज्य सरकारच्या दृष्टीस पडावी, यासाठी ‘लोकमत’ने विशेष वृत्तमालिका सुरू केली आहे. आजच्या भागात वडाळा परिसरातील खड्ड्यांचा घेतलेला हा सचित्र आढावा. वडाळा हे हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक. येथे प्रवाशांची मोठी ये-जा असते. सध्या मोनोरेल बंद पडल्यामुळे येथील प्रवाशांचा भार रस्ते वाहतुकीवरही आला आहे. मात्र, येथील रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना बरीच कसरत करावी लागत आहे. वडाळा स्थानकाच्या बाहेर पडल्यावर डेव्हिड एस. बरेटो हा मार्ग लागतो. जो पुढे जाऊन चार रस्त्याला जोडला जातो. या रस्त्याच्या बाजूला रफी अहमद किडवाई हा दक्षिण मुंबईकडे जाणारा मार्ग आहे. वडाळा स्टेशनवरून दादर पश्चिमेला जाण्यासाठी हा रस्ता खूप उपयोगी पडतो. मात्र, या मार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते असतानाही खड्डा पडल्यानंतर तात्पुरती डांबराची ठिगळं लावली जातात. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यानंतर हे डांबर वाहून जाते आणि पुन्हा खड्डे पडतात, असे येथील स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे.
फाइव्ह गार्डन मार्गे अनेक दुचाकीस्वार दादरला याच मार्गावरून जातात. फ्री वेवरून येणाºया
गाड्याही चार रस्त्यांवरूनच जातात. मात्र, या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. सकाळच्या वेळी आमच्या दुकानांसमोर वाहनांच्या
रांगा लागलेल्या असतात. पावसाळ्यात हे चित्र आमच्यासाठी दरवर्षीचे झाले आहे, असे या मार्गावरील दुकानदार आरिफ शेख यांनी सांगितले.
खड्डे बुजविण्यासाठी पालिका आयुक्तांनी ४८ तासांचा अवधी घेतलाय. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यांची अवस्था जैसे थेच आहे. पहिल्या पावसानेच या रस्त्यांची इतकी दुर्दशा झाली आहे. महापालिका खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून ते बुजविण्याचे काम करते. त्यात कधी-कधी टाकल्या जाणाºया रेतीमुळे पावसात वाहून येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, असेही येथील दुकानदारांनी सांगितले.
मागच्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वडाळा स्टेशनपासून चार रस्त्यापर्यंतच्या परिसरात पाणी भरले होते. रस्त्यांवर तुंबलेले पाणी, त्यात पडलेले खड्डे यामुळे पादचाºयांना येथून चालणेदेखील कठीण
झाले होते. पावसात पाणी भरल्यानंतर चालताना खड्ड्यांचा अंदाज आला नाही, तर या पादचारी जखमी होण्याचीसुद्धा चिन्हे आहेत.
हा विचार करता प्रशासनाने वेळीच हालचाल करून खड्डे बुजविणे गरजेचे आहे.
>‘२४ तासांत येथील रस्ते खड्डेमुक्त करू’
महापालिकेत प्रत्येक वेळी मी याबाबत आवाज उठविलेला आहे. खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे. कोल्डमिक्सचा वापर करूनही मुसळधार पावसानंतर रस्ते निकृष्ट कसे बनतात, हा सवाल मी नेहमी प्रशासनाला केलेला आहे. वडाळ्यातील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यासाठी मी पाठपुरावा करतोच आहे. येत्या २४ तासांच्या आत हे रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन प्रभाग क्र. १७८चे शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी दिले.
महापालिका आयुक्तांनी ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले आहे. एफ नॉर्थ विभागात प्रभाग १७८मध्ये हे रस्ते येतात. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग नाही. पालिका या रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी करते आणि काही दिवसांनी स्थिती जैसे थेच होते, असे प्रकार येथे सुरू आहेत. पालिकेने कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
- नितीन कदम, भाजपा पदाधिकारी,
वडाळा विधानसभा\वडाळ्यात अनेक महत्त्वाची महाविद्यालये, रुग्णालये आहेत. लहान मुले, रुग्णसुद्धा वडाळा स्टेशनवर उतरून याच रस्त्यांवरून दररोज प्रवास करतात. भर पावसात एखादी विपरीत घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? पालिकेने वेळीच उपाययोजना करावी.
- राखी राणे, स्थानिक रहिवासी

Web Title: Wadala road paved with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.