वडाळा वाहतूक पोलिसांचे कार्यालय कंटेनरमध्ये !

By admin | Published: May 7, 2016 12:53 AM2016-05-07T00:53:46+5:302016-05-07T00:53:46+5:30

एकीकडे मुंबई शहरात विविध प्रकल्प राबवून शहराचे रूप बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र याच मुुंबईतील वडाळा वाहतूक पोलीस गेल्या १० वर्षांपासून बंद कंटेनरमध्ये आपला कारभार चालवत

Wadala traffic police office in container! | वडाळा वाहतूक पोलिसांचे कार्यालय कंटेनरमध्ये !

वडाळा वाहतूक पोलिसांचे कार्यालय कंटेनरमध्ये !

Next

- समीर कर्णुक, मुंबई

एकीकडे मुंबई शहरात विविध प्रकल्प राबवून शहराचे रूप बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र याच मुुंबईतील वडाळा वाहतूक पोलीस गेल्या १० वर्षांपासून बंद कंटेनरमध्ये आपला कारभार चालवत आहेत. सध्याचा उकाडा पाहता या लोखंडी कंटेनरमध्ये पाच मिनिटेही कोणी बसू शकत नाही. मात्र वाहतूक पोलीस निमूटपणे येथे नोकरी करीत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासोबतच या सरकारी यंत्रणांचे देखील रूप पालटण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वडाळा वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरातील प्रमुख व्हीआयपी मार्गांची जबाबदारी आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि वडाळा सीएसटी रोड या मार्गांचा यात समावेश आहे. याच मार्गांवरून अनेक मंत्री आणि व्हीआयपी लोक मंत्रालय आणि साऊथ मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यामुळे या सर्वांच्या सुरक्षेची तसेच या मार्गात वाहतूककोंडी होणारा नाही याची सर्वस्वी जबाबदारी या पोलीस ठाण्यावर आहे. मात्र असे असताना या पोलीस ठाण्याकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. व वडाळा वाहतूक पोलीस ठाण्यात सध्या पाच अधिकारी आणि ६४ शिपाई असा एकूण ६९ जणांचा स्टाफ आहे. यातील काही जण कार्यालयीन काम करतात, तर बाकीचे सर्व जण विभागातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या कामात व्यग्र असतात. सध्या मुंबईसह सर्वच ठिकाणी उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच वाहतूक पोलीस देखील दिवसभर उन्हात ड्युटी करतात. मात्र काही वेळ विश्रांतीची गरज त्यांनाही भासते. तथापि, या कंटेनरमध्ये उष्णतेच्या झळा अधिक तीव्र लागत असल्याने पोलिसांना रस्त्यालगतच एखाद्या झाडाखाली विश्रांती घ्यावी लागते. उन्हाचे हे चार महिने असह्य असतात. याशिवाय पावसाळ्यात देखील यातील काही कंटेनरमधून पाणी गळत असल्याने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि सामानाचे देखील नुकसान होते.
याबाबत येथील एका कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, आम्ही सरकारी कर्मचारी असल्याने यावर काहीच बोलू शकत नाहीत. याबाबत आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र ही जागा बीपीटीची असल्याने या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र राज्य शासनाने यावर गांभीर्याने निर्णय घेतल्यास येथे पोलीस ठाणे बनणे शक्य आहे. त्यामुळे आम्हाला देखील या ठिकाणी काम करण्याचा उत्साह वाटेल, अशी माहिती या कर्मचाऱ्याने यावेळी दिली.

Web Title: Wadala traffic police office in container!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.