मुंबई : नवजात बालक गोंडस दिसते. मात्र पालघरजवळील डहाणू येथील एका गावात १३ दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ याला अपवाद आहे. हे बाळ दिसायला एखाद्या वयस्क व्यक्तीसारखे दिसते. या बाळाची त्वचा थोडीशी सुरकुतलेली आहे. या बाळाला नक्की काय झाले आहे, याचे निदान अद्याप झालेले नाही. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास या बाळाला परेलच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळ जन्माला आल्यावर असे का दिसते आहे, हे कोणालाच समजत नव्हते. यानंतर उपचार करण्यासाठी त्याला वाडिया रुग्णालयात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाळावर वाडिया मोफत उपचार करणार आहे. या बाळासाठी एनआयसीयूमध्ये एक खाट राखीव ठेवण्यात आली आहे. बाळ आल्यावर त्याला पाहून नक्की काय झाले आहे, याचे निदान होईल. बाळाच्या डोक्याच्या, पोटाच्या काही तपासण्या करण्यात येतील. यानंतर बाळाच्या रक्त तपासण्या करण्यात येतील यानंतर निदान करण्यात येईल. याला अजून दोन ते तीन दिवस लागतील असा अंदाज रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालघरच्या बाळावर वाडियात उपचार
By admin | Published: June 14, 2015 12:39 AM