मेट्रो-३ चा पर्यावरणावर ‘उतारा’

By admin | Published: March 1, 2017 01:49 AM2017-03-01T01:49:08+5:302017-03-01T01:49:08+5:30

प्रकल्पांतर्गत अडथळा ठरणाऱ्या सुमारे पाच हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याची टीका पर्यावरणवादी करत आहेत.

'Wade' on Metro-3 environment | मेट्रो-३ चा पर्यावरणावर ‘उतारा’

मेट्रो-३ चा पर्यावरणावर ‘उतारा’

Next


मुंंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून राबविण्यात येत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्या भुयारी मार्ग प्रकल्पांतर्गत अडथळा ठरणाऱ्या सुमारे पाच हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याची टीका पर्यावरणवादी करत आहेत. मुंबईच्या विकासाला, मेट्रो प्रकल्पाला किंवा कोणत्याच प्रकल्पाला विरोध नाही, अशी भूमिका पर्यावरणवाद्यांनी पूर्वीपासून घेतली आहे. मात्र विकासात्मक प्रकल्प राबवताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याचे भान ठेवण्याचे आवाहन सातत्याने पर्यावरणवाद्यांकडून केले जात आहे. मेट्रो-३ प्रकल्प उभा करताना वृक्षांचा बळी जाणार नाही याकडे पर्यावरणवाद्यांनी सातत्याने लक्ष वेधले आहे. मात्र मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत वृक्षहानीचा तिढा सुटत नसतानाच आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पर्यावरणावर ‘उतारा’ शोधून काढला आहे. कॉर्पोरेशनद्वारे ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
>६.५ लाख वाहनांच्या
फेऱ्या कमी होतील
मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होतील. त्यामुळे कार्बनडाय आॅक्साइडसारख्या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल. भविष्यात पर्यावरणासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी काही झाडांचे तात्पुरते नुकसान होणार आहे आणि ते नुकसान अपरिहार्य आहे. कॉर्पोरेशनला याबाबत खंत असून, होणाऱ्या नुकसानाची भरपाई वैज्ञानिक व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत केली जाणार आहे.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
हिरवळीची हमी
टाटा प्रोजेक्ट्स, आयटीडी सिमेंटेशन आणि सीईसी तैवानच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो-३ प्रकल्पांत तीनपट वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सूचित केलेल्या भागांत ८४ झाडांचे पुनर्रोपण आणि सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्याच्या कामाचा समावेश आहे. वृक्षांची लागवड करून मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची ३ वर्षे जोपासना केली जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, दादर स्थानक आणि माहीम येथे हे काम होणार आहे. हा संपूर्ण भाग भुयारी आहे.
- विनायक देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक, टाटा प्रोजेक्ट्स
>मुंबईला झाडे हवी; मेट्रो नको
मेट्रो प्रकल्प अभ्यास करून उभारण्यात येत आहे, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करत आहे. मग झाडे तोडली जाणार हे नागरिकांना गेल्या काही वर्षांत का सांगितले नाही? मेट्रोची कामे जेथे जेथे होत आहेत, तेथे तेथे कामाची तपशीलवार माहिती देणारा फलक असावयास हवा, पण तो कोठेही नाही. नर्दुल्ला टँक मैदान व साने गुरुजी उद्यान बंद करण्याचा अधिकार संबंधितांना आहे का? यावर लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईत यापूर्वी मोठे प्रकल्प झाले, मात्र वाहतूक व्यवस्था सुधारली नाही. प्रदूषण वाढतच गेले आणि पर्यावरणाची हानी झाली. मेट्रोबाबत केवळ झाडे तोडली जाणार हा एकमेव दुष्परिणाम नाही. अत्यंत विचित्र बाब म्हणजे मूळ योग्य नियोजनात असलेले शहराचे अधिकृत भागही उखडले जाणार आहेत.
- अ‍ॅड. गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय पर्यावरण चळवळ
>विकासाला पर्यावरणवाद्यांचा विरोध नाही
मेट्रो-३ प्रकल्पासाठी वृक्ष प्राधिकरणाने झाडे कापण्याकरिता परवानगी देतेवेळी भरपाई म्हणून जेवढी झाडे लावण्याची सूचना केली आहे; त्याव्यतिरिक्त कॉर्पोरेशन ‘प्रकल्प परिसर’ अंतर्गत झाडे वाटप करणार आहे.
मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाप्रमाणे मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
वृक्ष प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.
भरपाई म्हणून लावल्या जाणाऱ्या ३ हजार झाडांव्यतिरिक्त कॉर्पोरेशन हरित पुढाकार म्हणून ‘प्रकल्प परिसर’ अंतर्गत प्रत्येक प्रस्तावित स्थानकांवर
१ हजार रोपांचे वाटप करणार आहे.
संबंधित ठिकाणी वाटप करण्यात आलेल्या रोपांसह पर्यावरणबाबींची दखल घेतली जात आहे की नाही याची खबरदारी कंत्राटदारच घेणार आहेत.
सातत्याने उपस्थित करण्यात येत असलेल्या शंकांची दखल घेत कॉर्पोरेशनने ‘प्रकल्प परिसर’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरित गृह वायूंचे प्रमाण कमी होणार असून, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
>मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार २५ हजार रोपांचे वाटप
कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक

Web Title: 'Wade' on Metro-3 environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.