समोशासाठी प्रसिद्ध असलेल्या गुरुकृपा रेस्टॉरंटचे संस्थापक विशिनदास वाधवा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 01:24 AM2021-02-05T01:24:00+5:302021-02-05T08:00:47+5:30
मुंबईतील सायन येथील प्रसिद्ध गुरुकृपा रेस्टॉरंटचे संस्थापक विशिनदास वाधवा यांचे आज निधन झाले. ७६ वर्षांचे होते. त्यांनी सुरू केलेले गुरुकृपा रेस्टॉरंट हे चविष्ट समोसा आणि छोले टिक्कीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध होते.
मुंबई - मुंबईतील सायन येथील प्रसिद्ध गुरुकृपा रेस्टॉरंटचे संस्थापक विशिनदास वाधवा यांचे आज निधन झाले. ७६ वर्षांचे होते. त्यांनी सुरू केलेले गुरुकृपा रेस्टॉरंट हे चविष्ट समोसा आणि छोले टिक्कीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध होते.
विशिनदास वाधवा यांचे गुरुकृपा रेस्टॉरंट हे खवय्यांमध्ये समोशासाठी विशेषकरून ओळखले जाते. त्यांच्या रेस्टॉरंटमधील पदार्थांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते सिने कलाकारांपर्यंत मागणी असते. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन अशी दिग्गज मंडळी ही वाधवा यांच्या रेस्टॉरंटची ग्राहक राहिली आहे.
वाधवा यांच्या निधनाबाबत माहिती देताना त्यांचे नातू भारत यांनी सांगितले की, माझ्या आजोबांना हृदयविकारासंबंधीची सौम्य समस्या निर्माण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आमचे आजोबा हे आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहणार आहेत. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब कराचीमधील राहते घर सोडून रिकाम्या हाती भारतात आले होते. त्यानंतर काही काळाने गुरुकृपाच्या छोट्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली होती. नंतर चविष्ट पदार्थांमुळे या स्टॉलची उत्तरोत्तर भरभराट झाली. आमचे आजोबात सतत कार्यमग्न असायचे अगदी अखेरचे आजारी पडून रुग्णालयात जाईपर्यंत ते कार्यतत्पर होते.
वाधवा यांच्यावर सायनमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांचे पुत्र गोविंद हे त्यांचा वारसा पुढे चालवतील. गुरुकृपा हा गुरुवारी सकाळपासून बंद असून, ते शनिवारी उघडणार आहे, अशी माहितीही वाधवा यांचे नातू भारत यांनी दिली.