Join us

चाळी, इमारतीच्या कानाकोपऱ्यात उगवणाऱ्या वड, पिंपळ, उंबराचे रोपण आता आरेच्या जंगलात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

संडे स्पेशलचाळी, इमारतीच्या कानाकोपऱ्यात उगवणाऱ्या वड, पिंपळ, उंबराचे रोपण आता आरेच्या जंगलात होणारफळे तुम्ही खा; बिया आम्हाला ...

संडे स्पेशल

चाळी, इमारतीच्या कानाकोपऱ्यात उगवणाऱ्या वड, पिंपळ, उंबराचे रोपण आता आरेच्या जंगलात होणार

फळे तुम्ही खा; बिया आम्हाला द्या; युथ फॉर आरेची ‘आरे रीस्टोर’ मोहीम

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या चाळी, इमारती अथवा बांधकामांसह पडीक जागांत वड, पिंपळ, उंबर अशी अनेक प्रजातीची रोपटी उगवतात. ही रोपटी स्थानिकांकडून उपटून कचऱ्यात टाकली जातात. मात्र ही रोपटी उपटून कचऱ्यात टाकण्याऐवजी आमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. त्याचे आम्ही आरेच्या जंगलात रोपण करू. जेणेकरून आरेच्या जंगलात स्थानिक प्रजातीच्या झाडांना प्राधान्य मिळेल; आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल, असा विश्वास पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या व सिटीझन ग्रुप म्हणून ओळख असलेल्या युथ फॉर आरेने व्यक्त केला आहे. स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यासाठी युथ फॉर आरेने मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेला ‘रीस्टोर आरे’ असे नाव देण्यात आले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातून या मोहिमेंतर्गत स्थानिक प्रजातींची रोपे गोळा केली जात आहेत. शिवाय इमारतीच्या, चाळीच्या कानाकोपऱ्यात वाढलेली रोपे घेतली जात आहेत. कोरोनामुळे ही रोपे गोळा करण्यात काही अडचणी आहेत. मात्र एकदा का ही रोपे या मोहिमेत दाखल झाली की त्याचे आरेच्या जंगलात रोपण केले जाणार आहे. आपण जी फळे खातो त्याच्या बियादेखील आम्हाला देण्यात याव्यात, असे आवाहनही या मोहिमेद्वारे गेले केले आहे. आंबा, जांभूळ, करवंद या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि मग आमच्या स्वाधीन करा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. केवळ बिया असे नाहीतर रोपटी दिली तरी चालतील, असे युथकडून सांगण्यात आले.

आरेमध्ये परदेशी झाडे आहेत. पावसाळी वृक्ष आहेत. मात्र स्थानिक झाडे कमी आहेत. जैवविविधता समृद्ध करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून साडे चारशे स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. यासाठी आदिवासी समाजाची मदत घेण्यात आली आहे. या मोहिमेत सुरुवातीपासून आदिवासी समाजदेखील सहभागी आहे. स्थानिक प्रजातींच्या झाडांना प्राधान्य देत येथील जैवविविधता समृद्ध करणे हा मोहिमेचा उद्देश आहे, अशी माहिती मोहिमेतील कार्यकर्ते सुशांत बळी यांनी दिली. या मोहिमेत प्रत्येक मुंबईकर सहभागी आहे, असेदेखील त्यांनी नमूद केले.