Join us

वाडिया रुग्णालयाने साजरा केला रिद्धी-सिद्धीचा चौथा वाढदिवस

By admin | Published: May 09, 2017 5:15 PM

बी. जे. वाडिया बाल रुग्णालयात चार वर्षे वयाच्या दोन मुली आहेत आणि त्यांचे कायमचे वास्तव्य याच रुग्णालयात आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - बी. जे. वाडिया बाल रुग्णालयात चार वर्षे वयाच्या दोन मुली आहेत आणि त्यांचे कायमचे वास्तव्य याच रुग्णालयात आहे. रिद्धी आणि सिद्धी या एकमेकींना चिकटलेल्या जुळ्या मुली होत्या. त्यांना वाडिया हॉस्पिटलमध्येच वेगळे करण्यात आले. सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि इतर रुग्णांनी मिळून त्यांचा वाढदिवस साजरा केला. पनवेलमधील दाम्पत्याला 2013 साली ही दोन बाळे झाली. त्यावेळी या मुली एकमेकांना 180 अंशात चिकटलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना इथपर्यंत येऊन रुग्णालयात दाखल होणे शक्य नव्हते. या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या औचित्याने गो एअरचे अंतर्गत कर्मचारी वाडिया रुग्णालयातील मुलांसोबत एम्प्लॉयी व्हॉलंटिअरिंग अ‍ॅक्टिव्हिटीही साजरा केली.2014 साली वाडिया रुग्णालयात रिद्धी आणि सिद्धी यांना एकमेकांपासून वेगळे करण्यात आले. तेव्हापासून त्यांची वैद्यकीय काळजी आणि इतर सर्वांगीण संगोपन वाडिया रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे. या जुळ्या बहिणी त्यांच्या आकलनक्षमतेची कौशल्ये अधिक प्रतिसादक्षम आणि जुळवून घेण्याच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या दोन मुली रुग्णालयाजवळच असलेल्या प्रथम स्कूलच्या बालवाडीत जात आहेत. शाळेत मिळणाऱ्या पीअर ग्रुप थेरपीमुळे (समवयस्क उपचार पद्धती) त्यांना दिनचर्येमध्ये रुळण्यास मदत होत आहे. त्या काही मुळाक्षरे लिहिण्यासही शिकल्या आहेत. त्या दोघीही खूप क्रियाशील आणि प्रफुल्लित आहेत, सर्व कर्मचारीसुद्धा त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने वागतात. जेव्हा या दोन जुळ्या बहिणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्यांचे गर्भाशय, मूत्राशय एकच होते. त्याचे डॉक्टरांनी विभाजन केले. बालशल्यविशारद, निओनेटोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन, अस्थिविकारतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांचा समावेश असलेला 20 डॉक्टरांचा चमू त्यांना वेगळे करण्याच्या शस्त्रक्रियेत सहभागी होता. आम्ही गेली चार वर्षे या मुलींची सर्वांगीण काळजी घेत आहोत, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. या मुलींची दिनचर्या पहाटे पाच वाजता सुरू होते. न्याहारी केल्यानंतर या मुली त्यांच्या थेरपी सेशन्ससाठी जातात. शाळेतून परतल्यावर थोडीसी वामकुक्षी घेतात आणि त्यानंतर संध्याकाळी एक फेरफटका मारतात. मी स्वत: आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी या दोन मुलींची दररोज भेट घेतात. सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांच्याशी एक आपुलकीचे नाते तयार झाले आहे आणि त्यांच्या प्रगतीबद्दल व त्यांच्यात होत असलेल्या सुधारणेबाबत सर्व कर्मचारी समाधानी आहेत. शस्त्रक्रियेनंतरही या मुलींची वाढ परिपूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत आहेत, अशी पुष्टी बोधनवाला यांनी जोडली.