वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; निधीअभावी शस्त्रक्रिया रद्द, 300 रुग्णांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:45 PM2020-01-12T12:45:26+5:302020-01-12T12:46:30+5:30

पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा रुग्णांना फटका

Wadia hospital faces cash crunch discharge 300 patients cancels operations | वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; निधीअभावी शस्त्रक्रिया रद्द, 300 रुग्णांना डिस्चार्ज

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; निधीअभावी शस्त्रक्रिया रद्द, 300 रुग्णांना डिस्चार्ज

Next

मुंबई: राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून येणारा निधी थकल्यानं वाडिया रुग्णालय व्हेटिंलेटरवर आहे. औषधांचा साठा संपल्यानं रुग्णालय प्रशासनानं नव्या रुग्णांचं अ‍ॅडमिशन थांबवलं असून 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. निधी अभावी रुग्णसेवेवर परिणाम झाला असून शस्त्रक्रियांपासून बाह्यरुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली आहे. पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा फटका रुग्णांना बसत आहे.

वाडिया रुग्णालयाचा २०० कोटींपेक्षा अधिक निधी राज्य सरकार आणि महापालिकेकडे रखडला आहे. गेल्या काही दिवसांत पालिकेनं रुग्णालय प्रशासनाला १३ कोटी निधी दिले. मात्र या तुटपुंज्या निधीत रुग्णालय चालवणं अवघड असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेक विभागांमधल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शस्त्रक्रियादेखील रद्द केल्या आहेत. यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. 

वाडिया रुग्णालयात ३५ पेक्षा अधिक सुपरस्पेशॅलिटी सेवा दिल्या जातात. या रुग्णालयातल्या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीपणे केल्या आहेत. त्यामुळे राज्यासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यातले रुग्ण वाडियामध्ये उपचारांसाठी येतात. मात्र सध्या निधी अभावी वाडिया रुग्णालय अडचणीत सापडलं आहे. पालिका आणि राज्य सरकारकडून निधी मिळत नाही, तोपर्यंत सेवा पुरवणं कठीण असल्याचं रुग्णालच्या अधिष्ठाता शंकुलता प्रभू यांनी सांगितलं. दोनशे कोटींचा निधी संपल्यानं रुग्णालयाकडे औषधसाठा आणि इतर अत्यावश्यक गोष्टी नसल्याचं त्या म्हणाल्या. 

पालिका आणि राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्यानं वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे संतप्त झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी रुग्णालयाच्या आवारात धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाडिया रुग्णालयाचा अडकलेल्या निधीपैकी ५० टक्के निधी पालिका येत्या दोन-तीन दिवसांत देईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 
 

Web Title: Wadia hospital faces cash crunch discharge 300 patients cancels operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.