प्रवीण दरेकर यांनी केली मजुरी; पण, कोणी नाही पाहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 10:18 AM2021-12-16T10:18:14+5:302021-12-16T10:18:34+5:30

६० दिवसांच्या अंगमेहनतीचे घेतले रोख २५ हजार ७५० रुपये

Wages paid to bjp pravin Darekar But no one seen in 2017 got 25 750 rupees | प्रवीण दरेकर यांनी केली मजुरी; पण, कोणी नाही पाहिली

प्रवीण दरेकर यांनी केली मजुरी; पण, कोणी नाही पाहिली

Next

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २०१७ साली तब्बल ६० दिवस मजुरी केली आहे. या अंगमेहनतीपोटी त्यांना रोख २५ हजार ७५० रुपयेही मिळाले आहेत. सहकार विभागाने दरेकर यांना पाठविलेल्या नोटिसीतून ही बाब पुढे आली आहे. दरम्यान, आमदार म्हणून दरमहिना अडीच लाखांचे वेतन आणि भत्ते घेत असताना आपण मजूर कसे, या प्रश्नाचा खुलासा २१ डिसेंबरपर्यंत करावा, असे या नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सहकार विभागाच्या मुंबई सहनिबंधक केदारी जाधव यांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच ते बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मजूर संस्थेमार्फत मुंबई बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. मात्र दरेकर मजूर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने १२ डिसेंबर २०२१ रोजी केलेल्या तपासणीत प्रतिज्ञा मजूर संस्थेची कामवाटप वही सापडली नाही. सभासदांच्या हजेरीपटानुसार दरेकर यांनी मजुरीपोटी रोख रक्कम घेतल्याचे आढळून आले आहे. हजेरी पत्रकावर सुपरवाझर म्हणून सह्या करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्यक्ष मजुरीचे काम केल्याचे दिसून आले नसल्याचे विभागाने आपल्या नोटिसीत म्हटले.

दरेकर यांनी विधान परिषद निवडणुकीची वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. तर, आमदार म्हणून त्यांना दरमहा अडीच लाख मिळतात. त्यामुळे प्रथमदर्शनी आपण मजूर असल्याचे दिसून येत नाही. तसेच २१ डिसेंबरपर्यंत विभागीय सहनिबंधक कार्यालयात बाजू मांडावी, असे नोटिसीत नमूद केले आहे.

सभासदांच्या हजेरीपटानुसार दरेकर यांनी घेतलेली मजुरी
एप्रिल २०१७ - ३० दिवस-प्रतिदिन ४५० रुपये प्रमाणे १३,५००
नोव्हेंबर २०१७ - २० दिवस-प्रतिदिन ४५० रुपये प्रमाणे ९,०००
डिसेंबर २०१७ - १० दिवस-प्रतिदिन ३२५ रुपये प्रमाणे ३,२५०

‘नोटीस अद्याप मिळालेली नाही’
प्रवीण दरेकर यांनी आपणास अशी नोटीस मिळाली नसल्याचे माध्यमांना सांगितले. माझ्याकडे अशी नोटीस आली नाही. बँकेत आली असेल तर त्याला योग्य व्यासपीठावर उत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Wages paid to bjp pravin Darekar But no one seen in 2017 got 25 750 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.