‘वाघ एकला राजा’!

By Admin | Published: February 25, 2017 03:50 AM2017-02-25T03:50:13+5:302017-02-25T03:50:13+5:30

दक्षिण मुंबईतील मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या वरळी, लालबाग, परळ आणि शिवडीमध्ये एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेने ‘वाघ एकला राजा’ असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे

'Wagh Ekela Raja'! | ‘वाघ एकला राजा’!

‘वाघ एकला राजा’!

googlenewsNext

चेतन ननावरे ,  मुंबई
दक्षिण मुंबईतील मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या वरळी, लालबाग, परळ आणि शिवडीमध्ये एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेने ‘वाघ एकला राजा’ असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. याआधी याच भागातून सेनेने विधानसभेवर दोन आमदार धाडले होते. आता १४पैकी १२ जागांवर सेनेच्या उमेदवारांनी विजयी डरकाळी फोडत आपली दावेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली.
उमेदवारी देताना सेनेला लालबाग, वरळीसह शिवडी परिसरातही मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला होता. किशोरी पेडणेकर यांना दिलेल्या उमेदवारीनंतर वरळीतील नाराज महिला शिवसैनिक ‘मातोश्री’वर धडकल्या होत्या. खुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात शिवसैनिकांसह स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली
होती.
लालबागमधून अनिल कोकीळ यांना उमेदवारी मिळाल्याने गणेशगल्ली आणि परळ गावातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करून रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला होता. लालबाग-परळमधून शिवसेनेचे जुने नगरसेवक नाना आंबोले यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारल्याने सेनेला नानांच्या बंडखोरीचा सामना करावा लागला होता. दादरमध्येही आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान याला उमेदवारी दिल्याने महेश सावंतसारख्या अनुभवी शिवसैनिकाला बंडखोरी करावी लागली.
सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी संयम राखत या सर्वांची समजूत काढली. दादरमधील महेश सावंतविरोधात समाधान सरवणकर ही लढत वगळता, सर्व ठिकाणी सेनेने एकहाती सत्ता मिळवून दाखवली.
नाराज पदाधिकाऱ्यांना पदे देताना शिवसैनिकांचा विश्वास संपादन करण्यातही सेनेला यश आले. शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये, म्हणून सेनेने मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी उतरवले.

भाजपाला कार्यकर्त्यांची गरज!
नेते आयात करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कार्यकर्ते तयार करण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईसह राज्यात १ नंबरच्या पक्षाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपाला या ठिकाणी १४पैकी एकाही जागेवर यश मिळाले नाही. धक्कादायक बाब म्हणजे केवळ ४ जागांवर भाजपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून, काही ठिकाणी पहिल्या तिघांतही भाजपाचा उमेदवार नाही. लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा द्यायचा असेल, तर भाजपासमोर या दोन्ही वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांची फॅक्टरी निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही.

प्रभाग क्रमांक १९७ वगळता सहा ठिकाणी सेनेला यश मिळाले. प्रभाग क्रमांक १९७मध्ये सेनेला दुसऱ्या क्रमांकावर झेप घेता आली. एफ साऊथ वॉर्डमध्येही प्रभाग क्रमांक २०१चा अपवाद वगळता सेनेने एकहाती विजय साकारला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही वॉर्डमधील सेनेच्या बहुतांश विजयी उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

राष्ट्रवादीची टीकटीक का थांबली?
राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना त्यांच्या वॉर्डमध्ये एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे येथील काही प्रभागांत राष्ट्रवादीकडे उमेदवारच नव्हते. मुंबईची जबाबदारी असल्याने अहिर यांचे त्यांच्या वॉर्डकडे होणारे दुर्लक्ष राष्ट्रवादीला भलतेच भोवले आहे. अहिर यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीला या ठिकाणी नवे नेतृत्व उभारण्याची गरज आहे. नाहीतर आता बंद पडलेल्या घडाळ्याची टीकटीक आगामी लढाईत नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठी मतदारांचा भरणा असलेल्या या प्रभागांत गेल्या महापालिका निवडणुकीत मनसने भरभरून मते मिळवली होती. यंदा मनसेचे दत्ता नरवणकर वगळता कोणत्याही उमेदवाराला चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. त्यामुळे मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चिंतन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: 'Wagh Ekela Raja'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.