Join us

वाहिद शेखच्या घराची तब्बल सहा तास तपासणी; एनआयएची छापेमारी अखेर पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 5:22 PM

घरातून कुठलेही संशयास्पद कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स एनआयएला मिळाले नसल्याचा दावा वाहिद शेखने केला आहे.

मुंबई: तब्बल सहा तासानंतर विक्रोळी पार्कसाईटमधील वाहिद शेखच्या घरात सुरू असलेली एनआयएची छापेमारी अखेर पूर्ण झाली आहे. काही वेळापूर्वीच एनआयएची टीम ही वाहिद शेखच्या घरातून बाहेर पडली. एनआयएने तब्बल सहा तास वाहिद शेखच्या घराची तपासणी केली. यावेळी घरातून कुठलेही संशयास्पद कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावा एनआयएला मिळाले नसल्याचा दावा वाहिद शेखने केला आहे.

वाहिद शेख म्हणाला की, ज्यावेळी ही छापेमारी सुरू होती, त्यावेळी कुठल्याही प्रकारचे चित्रीकरण हे केले गेले नाही. तसेच आम्हाला कुठलीही नोटीस दिली नाही. ज्याप्रमाणे २००६ मध्ये मला एका खोट्या गुन्ह्यात अटक केली गेली, त्याप्रमाणे आता पुन्हा कुठल्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाऊ नये, अशी प्रतिक्रिया ही वाहिद शेखने माध्यमांशी बोलताना दिली. पहाटे साडेचार वाजता एनआयएचं पथक वाहिद शेखच्या विक्रोळी पार्क साईट येथील घरी पोहोचलं होतं. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत एनआयए चे अधिकारी हे स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहिद शेख यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु वाहिद शेख यांनी त्यांच्या वकिलांना देखील बोलावलं होतं. अखेर ११ नंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनआयएची टीम ही वाहिद शेख यांच्या घरात शिरली आणि त्यानंतर छापेमारीला सुरुवात केली होती.

यूपीच्या अनेक शहरांमध्ये छापेमारी

उत्तर प्रदेशातील लखनौ, बाराबंकी, बहराइच, सीतापूर, हरदोई येथेही छापे टाकण्यात आले आहेत. लखनौमधील मदेगंज येथील बडी पकरिया भागातील तीन घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएच्या टीमसोबत सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांची टीमही हजर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :राष्ट्रीय तपास यंत्रणामुंबई