Gajanan Kirtikar ( Marathi News ) : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात असले तरी त्यांचे वडील व विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. अशातच गजानन कीर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खळबळजनक विधान केलं आहे.
"रवींद्र वायकर हे महिना-दोन महिन्यांपूर्वीचं प्रोडक्ट आहे. ईडीची चौकशी सुरू झाल्यामुळे मी पक्ष बदलला, असं त्यांनी स्वत:च मुलाखतीतून सांगितलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात मला ई-समरी द्या, मग मी उमेदवारी घेईल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची अटक टळली आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाचाही टांगती तलवार टळली," असा दावा गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. महायुतीसोबत असणाऱ्या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे.
दरम्यान, "निवडणुकीत सर्वच उमेदवार तुल्यबळ असतात. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातही यंदा काँटे की टक्कर होत आहे. त्यामुळे नक्की कोण जिंकणार, हे आज सांगता येणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळे मला जमेल तेवढा प्रचार मी रवींद्र वायकर यांचा केला आहे. मी माझं मतदानही रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाला दिलं," असंही गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.
ईडीबद्दल लोकांमध्ये नाराजी
गजानन कीर्तीकर यांनी आज मतदानानंतर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारभावरही टीका केली आहे. "ईडीबद्दल आता लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि लोक ही नाराजी व्यक्तही करू लागले आहेत. ईडीबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या वरिष्ठांच्याही लक्षात आली असून पुढील काळात ते या कारवाया कमी करतील," असं त्यांनी म्हटलं आहे.