मुंबई - राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात अद्यापही काही जागांवरुन घटक पक्षांमध्ये वाद आहे. त्यामुळे, अद्यापही काही जागांवर महाविकास आघाडीचे तर काही जागांवर महायुतीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये, ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून निलेश लंकेंना अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, लोकसभेच्या मैदानता माढ्यातील तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे, माढा मतदारसंघातील उमेदवारासाठी वेट अँड वॉच अशीच भूमिका दिसून येत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निंबाळकर यांच्या उमेदवारीला माण-खटावमधून रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवाराबाबत चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राशपचे प्रमुख शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्या घरात उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार, धैर्यशील मोहिते पाटील यांनी तयारीही केली असून गावभेटी आणि प्रचाराच्या दौऱ्यातून लोकांचे मत ते जाणून घेत आहेत. त्यातच, जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार अशी घोषणाही केली आहे. त्यामुळेच, शरद पवारांच्या उमेदवारीच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, बारामती आणि दक्षिण अहमदनगर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून माढा मतदारसंघ अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. म्हणूनच, माढ्यातून कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, खा.सुप्रियाताई सुळे यांना बारामती, खा. अमोल कोल्हे यांना शिरुर, मा. निलेश लंकेंना नगर दक्षिण, वर्धा येथून अमर काळे आणि दिंडोरीतून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, शिरुर मतदारसंघात आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, महायुतीकडून अद्यापही बारामती आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. तर, सातार लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच त्यांची अधिकृत उमेदवारा जाहीर होणार आहे.