मराठी पाट्यांवर पालिकेची दोन महिने ‘वेट अँड वॉच’ भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:42 AM2023-09-27T11:42:44+5:302023-09-27T11:43:07+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशाचा परिणाम

'Wait and watch' role of municipality for two months on Marathi boards? | मराठी पाट्यांवर पालिकेची दोन महिने ‘वेट अँड वॉच’ भूमिका?

मराठी पाट्यांवर पालिकेची दोन महिने ‘वेट अँड वॉच’ भूमिका?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  दोन महिन्यांत दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करा, असा दट्ट्या सर्वोच्च  न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई महापालिकेनेही  दोन महिने  ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेण्याचे ठरविले असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. न्यायालयाच्या निर्णयाची किती  अंमलबजावणी  झाली, हे स्पष्ट झाल्यानंतर पालिका पुढील पाऊल उचलेल.  

ऑक्टोबरमध्ये मराठी पाट्यांचे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पालिकेने कारवाईला स्थगिती दिली होती. तत्पूर्वी ४  नोव्हेंबर २०२२ पर्यंत पालिका कारवाई करीत होती. १० ऑक्टोबर  २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पालिकेने मराठीतून नामफलक न लावणाऱ्या दुकानदारांवर शेवटची कारवाई केली होती. या कालावधीत पालिकेच्या पथकाने २८ हजार ६५३ दुकानांना भेटी दिल्या होत्या. त्यापैकी २३ हजार ४३६ दुकानदारांनी नियमाचे पालन करत नामफलक मराठीतून लावल्याचे दिसून आले. तर ५,२१७ दुकानदारांनी नामफलक मराठीतून लावले नसल्याचे आढळून आले होते.  त्यानंतर या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने पालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळाली. दोन महिन्यांत नामफलक मराठीतून लावा, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिल्याने मराठी नामफलकांचा  प्रश्न निकालात निघाला आहे. पालिकेनेही तत्परतेने गेल्या वर्षीच्या कारवाईचा तपशील जाहीर केला आहे.

त्यानंतर कारवाईची रूपरेषा ठरविणार
न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतर पालिका लगेचच कारवाईला सुरुवात करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, नामफलक दोन महिन्यांत लावावेत, असा आदेश न्यायालयाने  दिला आहे. त्यामुळे सध्या तरी  दोन महिने थांबण्याची आमचीही भूमिका आहे. न्यायालयानेच मुदत दिली असल्याने त्या मुदतीत किती  दुकानदारांनी मराठीतून पाट्या लावल्या आहेत, किती दुकानदारांनी लावल्या नाहीत, हे स्पष्ट होईल. त्यानंतर कारवाईची रूपरेषा ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Wait and watch' role of municipality for two months on Marathi boards?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.