मुंबई : पोलीस आयुक्तालयाच्या आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या सहामजली वास्तूचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत झाले. तथापि, येथील कामकाज प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी किमान महिन्याभराचा अवधी लागणार आहे. या ठिकाणी नियंत्रण कक्ष वगळता अन्य बहुतांश कार्यालयांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. सहाव्या मजल्यावर केवळ मोकळा हॉल आहे. अनेक कामे शिल्लक असताना उद्घाटनांचा अट्टाहास का करण्यात आला, असा प्रश्न पोलीस वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.सुमारे ६५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या सहा मजली कार्यालयात सर्व अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. विविध कक्ष व विभागांची कामे, सुतारकाम अद्याप अपूर्ण आहे. असे असताना सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुभाष देसाई व दोन्ही गृहराज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम उरकण्यात आला. वास्तविक, या इमारतीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त अरुण पटनाईक असताना या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्या वेळी प्रस्तावित इमारतीसाठी ३३ कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र विविध कारणांमुळे काम रेंगाळल्याने खर्च दुप्पट झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
नवीन आयुक्तालयासाठी महिनाभर थांबा
By admin | Published: December 30, 2015 1:24 AM