Join us

अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:50 AM

परिवहन विभागातील वरिष्ठ पदांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पद रिक्त आहे. परिवहन मुख्यालयात उपायुक्त स्तरावरील पाचपैकी तीन पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परिवहन विभागातील वरिष्ठ पदांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पद रिक्त आहे. परिवहन मुख्यालयात उपायुक्त स्तरावरील पाचपैकी तीन पदे रिक्त आहेत. शहरातील अंधेरीसह वडाळा आणि राज्यात ३ ठिकाणी आरटीओ पद अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, रिक्त पदांच्या कामांचा ताण अन्य अधिकाऱ्यांवर येत असल्याने, त्याचा फटका कारभारावर होत आहे.राज्यातील परिवहन विभागाचा कारभार संथ गतीने होत असल्याची ओरड सतत नागरिक करत आहेत. लायसन्स काढणे, वाहन नोंदणी करणे, परवाना नूतनीकरण करणे अशा विविध कामांसाठी दुचाकी-चारचाकी वाहन चालक मोठ्या संख्येने आरटीओमध्ये येतात. मात्र, उपस्थित आरटीओ अधिकाऱ्यांकडे कामांचा ताण असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास होत आहे. शिवाय प्रशासकीय स्तरांवर वरिष्ठ अधिकारी पदे रिक्त असल्याने, कनिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक अडचणींना सोमोरे जावे लागते. औरंगाबाद, लातूर, अमरावती विभागात आरटीओ पद रिक्त आहे. मुंबईतील अंधेरी आणि वडाळा येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद रिक्त आहे. परिणामी, तेथे काम सुरळीत राहण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांवर तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र, या तात्पुरत्या जबाबदारीमुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.मोटार विभागाचे संकेतस्थळ ‘नो-अपडेट’राज्यातील सर्व यंत्रणेचा कारभार पारदर्शकपणे सुरू राहण्यासाठी सरकारने सर्व यंत्रणा आॅनलाइन केली. मात्र, मोटार विभागाचे संकेतस्थळ नो-अपडेट असल्याचे दिसून येते. मोटार वाहन विभागातील मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांचा तपशील ३१ मार्च २०१६ रोजी अद्ययावत करण्यात आला होता. तब्बल १५ महिने उलटल्यानंतरदेखील संकेतस्थळावरील माहिती अपडेट केलेली नाही. संकेतस्थळावरील माहितीनुसार, राज्यात परिवहन विभागाची एकूण (अ+ब+क+ड) ४ हजार १०० पदे आहेत. त्यापैकी २,८४३ पदे भरलेली असून, १,२५७ पदे रिक्त आहे. अ गटातील राज्यभरात ११९ पदे रिक्त आहेत.