प्रतीक्षा संपली; अखेर स्वदेशी बनावटीची मेट्रो मुंबईत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 06:24 AM2021-01-28T06:24:31+5:302021-01-28T06:24:41+5:30
दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढील तीन वर्षांत येतील. यात ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देऊन पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जाणार आहे
मुंबई : बंगळुरू येथून २२ जानेवारी रोजी निघालेली पहिली मेट्रो २७ जानेवारी रोजी रात्री मुंबईत दाखल झाली. मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावर ही चालकविरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावेल. चारकोप कारशेडमध्ये ती दाखल झाल्यानंतर तपासण्या करून दोन महिन्यांत मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू होतील. मे महिन्यापासून मेट्रो सेवेत दाखल होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला.
मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी ८ कोटी खर्च झाले आहेत. ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. प्रत्येक ट्रेन ६ कोचची आहे. कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८० आहे. कोचच्या निर्मितीसाठी एकूण ३०१५ कोटी खर्च आहे. एकूण कोचची संख्या ५७६ पर्यंत वाढणार आहे. पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल होतील. त्यानंतर दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढील तीन वर्षांत येतील. यात ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देऊन पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.