मुंबई : आरटीई २५ टक्के अंतर्गत पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळाली. १ आॅक्टोबरपासून प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ८ आॅक्टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. १७ मार्चला आरटीई प्रवेश प्रक्रियेची आॅनलाइन पहिली सोडत काढण्यात आली. राज्यातील ९,३३१ शाळांमधील १ लाख १५ हजार ४५५ जागांसाठी २ लाख ९१ हजार ३६८ अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोनाकाळात मुदतवाढीनंतर ६८,२८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यात पुण्यातून सर्वाधिक ११,०१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल नागपूर ४,५९९, नाशिक ३,६८८, ठाणे ५,६४१, मुंबई ३,१३२ आणि औरंगाबाद येथील ३,०९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.मुंबई विभागातील पालिका विभागाच्या अखत्यारीतील शाळांमधून २,२४३, उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील शाळांमधून ८८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुंबईतून निवड झालेल्या ५,३७१ पैकी ५,२२८ विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेशासाठी तारीख दिली होती. यातील ३,१३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.त्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. पालकांनी आरटीई पोर्टलवर विद्यार्थी अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पाहावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.शाळेत गर्दी न करण्याच्या सूचनाप्रवेशासाठी शाळेत गर्दी करू नये. प्रवेशादरम्यान बालकांना शाळेत आणू नये. कागदपत्रांच्या मूळ, छायांकित प्रती सोबत असाव्यात. हमीपत्र, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत न्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना केल्या आहेत.