स्वस्त विजेसाठी तीन महिने थांबा!
By admin | Published: July 4, 2014 01:10 AM2014-07-04T01:10:28+5:302014-07-04T01:10:28+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, रिलायन्स, टाटा आणि महावितरण या चार वीज कंपन्या वीजपुरवठा करत आहेत.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टाटा पॉवर कंपनीला मुंबई शहरात वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळाली असली तरी येथे वीजपुरवठ्याचे जाळे उभारण्यासाठी कंपनीला आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने वीज ग्राहकांनाही स्वस्त विजेसाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, रिलायन्स, टाटा आणि महावितरण या चार वीज कंपन्या वीजपुरवठा करत आहेत. मुंबई शहरात बेस्ट, उपनगरात रिलायन्स, टाटा आणि महावितरण विजेचा पुरवठा करत आहे. महावितरण ही कंपनी भांडुप आणि मुलुंड येथील वीज ग्राहकांना विजेचा पुरवठा करत आहे. या चारही वीज कंपन्यांपैकी टाटा पॉवरची ३०० युनिटपर्यंतची वीज स्वस्त आहे. आणि उद्योगधंद्यांसाठीचा विजेचा विचार करता रिलायन्सची वीज टाटाच्या तुलनेत स्वस्त आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने टाटा पॉवरला बेस्टच्या क्षेत्रातही वीजपुरवठा करण्याची परवानगी दिली आहे. शिवाय मुंबई शहरात वीजपुरवठा करताना स्वत:चे स्वंतत्र विजेचे जाळे उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र पावसाळ्याचे तीन ते चार महिने गृहीत धरता टाटा पॉवरला विजेचे स्वतंत्र जाळे उभारण्यात अडचणी येत आहेत.
परिणामी हे तीन महिने संपल्यानंतरच टाटा पॉवर कंपनी मुंबई शहरातील ग्राहकांसाठी सविस्तर योजना जाहीर करणार आहे. आणि त्यानंतरच येथील वीज ग्राहकांना स्वस्त विजेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, टाटा पॉवरचे कार्यकारी संचालक अशोक सेठी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, मुळात कुलाब्यात आमचे पावर रिसिव्हिंग स्टेशन आहे. त्यामुळे कुलाब्यातील; थोडक्यात दक्षिण मुंबईतील लहान पॉकेट्समधील छोट्या ग्राहकांना लवकरात लवकर स्वस्त वीज उपलब्ध करून देणार आहोत. शिवाय येथील ग्राहकांना विजेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार असून, पूर्व उपनगरातील सार्वजनिक शौचालयांवरील जागेचा वापर
करत तेथे ग्राहकांसाठीची
उपकेंद्रे उभारण्यात येणार
आहेत. (प्रतिनिधी)