Join us  

आठवडाभर थांबा किंवा व्हीसीद्वारे चौकशी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:05 AM

अनिल देशमुख ; ईडीच्या दुसऱ्या समन्सला बगल, कोरोनासह प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजरीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ...

अनिल देशमुख ; ईडीच्या दुसऱ्या समन्सला बगल, कोरोनासह प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास मंगळवारी असमर्थता दर्शवली. वय, आजारपण व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत कार्यालयात हजर राहू शकत नाही, त्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) चौकशी घेण्याची विनंती केली. अन्यथा आवश्यक संबंधित कागदपत्रांनिशी हजर होण्यासाठी आठ दिवसांचा अवधी मागितला. देशमुख यांच्या वकिलांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन यासंबंधीचा विनंती अर्ज सादर केला.

मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग हे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसमवेत ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी आपल्या अशिलाच्यावतीने तीन पानी विनंती अर्ज अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यांच्याशी सुमारे चाळीस मिनिटे चर्चा केल्यानंतर ते बाहेर आले. ईडीच्या चौकशीसाठी देशमुख सहकार्य करीत असून, त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ८ दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यावेळी आवश्यकतेनुसार देशमुख हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, ईडीकडून त्यांना लवकरच तिसरे समन्स जारी केले जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, देशमुख आज चौकशीला हजर झाल्यास ईडी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी होईल, या शक्यतेने परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. यापूर्वी २६ जून राेजी समन्समध्ये कोणत्या विषयासंबंधीच्या चौकशी करणार हे नमूद नसल्याचे कारण देत देशमुख चौकशीला हजर राहिले नव्हते. दरम्यान, गेल्या शुक्रवारी ईडीने देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली. त्यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेकडून ४.७० कोटी हप्ता घेतल्याचा आरोप आहे.

............................................................