मुंबई : सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल अजूनही प्रवाशांच्या सेवेत आलेली नाही. या लोकलच्या अंतिम २० चाचण्यांना सुरुवात झालेली नसून भेल (भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड) कंपनीकडून चाचण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ही लोकल प्रत्यक्षात सेवेत येण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल सात महिन्यांपूर्वी दाखल झाली. मात्र काही तांत्रिक अडथळे उद्भवल्याने या लोकलच्या चाचण्यांनाही उशीर झाला. कारशेडमध्ये घेण्यात आलेल्या अंतर्गत चाचण्यांमध्ये एसी लोकल पास झाली. परंतु एसी लोकलची उंची जास्त असल्याने मध्य रेल्वेने ही लोकल चालवण्यास नकार दिला आणि पश्चिम रेल्वेने लोकल चालवावी, अशी मागणी केली. मात्र पश्चिम रेल्वेला सुरुवातीला काही तांत्रिक अडथळे उद्भवत असल्याने लोकल धावू शकते का याची चाचपणी त्यांनी केली. तांत्रिक अडथळे दूर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावू शकते आणि त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी घेण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाची प्रतीक्षा पश्चिम रेल्वेला आहे. तत्पूर्वी एसी लोकलच्या कारशेडबाहेरही चाचण्या घेण्यात येणार असून, जवळपास २० अंतिम चाचण्या घेण्यात येतील. एसी लोकल भेल कंपनीची असल्याने त्यांच्याकडून यात काही बदल केले जात आहेत. त्यामुळे २0 चाचण्या घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चाचण्या घेण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील आणि त्यानंतरच ही लोकल धावेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एसी लोकलच्या चाचण्यांची प्रतीक्षाच
By admin | Published: February 07, 2017 4:34 AM