मुंबई : घाटकोपरमध्ये आचार्य अत्रे मैदान, नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान, जनरल अरुण कुमार मैदान ही प्रमुख मैदाने आहेत. पण ही सर्व मैदाने सध्या सुविधांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. आचार्य अत्रे उद्यानामध्ये दिवसभर जुगारी, दारुड्यांचा वावर असतो. रात्री तर त्यांना कोणाचेच बंधन नसल्याने त्यांची संख्या खूप जास्त असते, त्यांना रोखणारेसुद्धा कोणी नाही.मैदानामध्ये दारुडे राजरोसपणे दारू पीत बसतात. अनेकदा दारू पिऊन दारुडे धिंगाणा घालतात. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणे होणे, हाणामारी होणे अशा घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. मैदानाच्या बाजूला असलेल्या झाडांखाली जुगाऱ्यांचे डाव रंगतात. यावर स्थानिकांनी सांगितले की, परिसरातील अनेक लोकांनी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या जुगारी आणि दारुड्यांमुळे अनेक नागरिक आपल्या मुलांना मैदानात खेळायला पाठवत नाहीत.मैदानामध्ये सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. मैदानामध्ये खुली व्यायामशाळा आहे. व्यायामशाळा अतिशय अस्वच्छ असल्यामुळे कोणीही त्या व्यायामाच्या साहित्याचा वापर करीत नाही. मागील अनेक दिवसांपासून मैदानामध्ये साफसफाई केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्रशासनाने मैदानाची दररोज साफसफाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तुलनेने सुभाषचंद्र बोस उद्यान आणि जनरल अरुणकुमार मैदान बरी असली तरी मैदानांमध्ये पाणपोईची व्यवस्था, विजेची व्यवस्था, पहारेकऱ्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या स्थानिक नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)
घाटकोपर, विद्याविहारमधील उद्याने सुविधांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: April 25, 2017 1:45 AM