Join us

बोरगाव ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: January 29, 2015 10:47 PM

कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या बोरगाव ग्रामस्थांसाठी बांधण्यात येत असलेल्या पोसरी नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे

कर्जत : कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या बोरगाव ग्रामस्थांसाठी बांधण्यात येत असलेल्या पोसरी नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. येथील रहिवाशांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी पेंढरी येथे असलेल्या पुलावरून जावे लागते, त्यासाठी तब्बल सात किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने स्थानिकांनी पोसरी नदीवर पूल बांधण्याची मागणी केली होती.कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१२ मध्ये २३ लाखांच्या खर्चाच्या बोरगाव येथील पुलाच्या कामाला परवानगी दिली होती. साठ मीटर लांबीच्या पुलावरून जेमतेम एक वाहन जाईल, अशी रचना आहे. बोरगाव गावातील शेतकऱ्यांची सुमारे सहाशे एकर जमीन नदीच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असेल तर ग्रामस्थांना प्रथम पेंढरी आणि नंतर शेताकडे यावे लागायचे. पेंढरी येथे पोसरी नदीवर एक पूल आहे. मात्र ते अंतर बोरगाव येथून तीन किमी आणि तेथून शेती तीन किमी आहे. गेली तीन वर्षे सुरु असलेल्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने पुलासाठी सहा ठेवे बांधून त्यावर स्लॅबही टाकले आहेत. मात्र नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते जोडण्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केलेले नाही. परिणामी पूल रहदारीसाठी खुला झालेला नाही. कर्जत सार्वजानिक बांधकाम विभागाने तत्काळ पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ओलमण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कलाबाई पोसाटे आणि सदस्या कविता डोंगरे यांनी केली आहे.