मुंबईत उकाडा : किमान तापमान १६ ते १८ अंशावर स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळी संपून आता नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध आला तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात अद्यापही म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. कारण हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, सातत्याने हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल होत असून, यामुळे किमान तापमान १६ ते १८ अंशावर स्थिर राहत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्यात सांगली, माथेरान, नांदेड, बारामती, मालेगाव, नाशिक, सातारा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जळगाव, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या शहरांचे किमान तापमान १६ ते २० अंश नोंदविण्यात आले. मुंबईचे किमान तापमान अद्यापही १६ अंश नोंदविण्यात येत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यात बऱ्यापैकी गारठा पडला होता. विशेषत: मुंबईचे किमान तापमान १९ अंशांवर दाखल झाले होते. तर राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीचा जाेर हाेता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडलेला गारठा दुसऱ्या आठवड्यातही काही दिवस कायम होता. मात्र दिवाळी दाखल होते तोच मुंबईतील थंडी गायब झाली आणि किमान तापमानाचा पारा थेट २३ अंशांवर गेला. वाढत्या तापमानाचा मुंबईकरांना फटका बसत असून, उकाड्यात किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे.
* डिसेंबरमध्ये मुंबईचा पारा ७ अंशांखाली जाणार
यंदा पाऊस जास्त झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणखी गारठणार असून, मुंबईचे तापमान डिसेंबरपर्यंत १५ अंशाच्या खाली घसरेल. २० डिसेंबरपासून थंडी वाढणार असून तापमान ५ अंशापेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच पुण्याचा पारा ७, नागपूरचा ५ अंशाखाली जाण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
...................................................