मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:10 AM2019-11-19T03:10:55+5:302019-11-19T03:11:09+5:30
राज्यात थंड वाऱ्याचा प्रवाह; तापमानात घट, कोकणासह गोव्यात पावसाची शक्यता
मुंबई : पश्चिम हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांमधून थंड वाºयाचा प्रवाह उत्तर मैदानावर पुन्हा सुरू झाला आहे. परिणामी, तापमान कमी होत असून, महाराष्ट्राचा विचार करता मुंबई वगळता उर्वरित शहरांच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित शहरे वगळता मुंबई अद्यापही थंडीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, हवामान बदलातील नोंदीमुळे मंगळवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. तर २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील.
‘स्कायमेट’कडील माहितीनुसार, सोमवारी सफदरजंग वेधशाळेमध्ये १५.३ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. केवळ दिल्लीच नाही, तर उत्तर-पश्चिम भारतातील पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थानमध्येही किमान तापमानात घट झाल्याच्या नोंदी होत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस उत्तरेकडील मैदानात हिवाळ्यास सुरुवात होईल. सकाळ आणि सायंकाळी गारवा अनुभवायला मिळेल.
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
दिल्लीकर ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान धोकादायक प्रदूषणाशी झुंजत होते. आता मात्र प्रदूषणात किंचित घट झाली आहे. हवेच्या गुणवत्तेत १७ नोव्हेंबरला सुधारणा झाली. सोमवारी दिल्लीकरांची पहाट स्वच्छ वातावरणात झाली. तर, मुंबईतील हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे.
राज्याच्या विविध शहरांतील सोमवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
उस्मानाबाद १३.४
नाशिक १४.८
जळगाव १५
परभणी १५.५
बारामती १७
नांदेड १८.१
सोलापूर १८.६
सांगली १९.६
कोल्हापूर २०.३
माथेरान २०.४
सांताक्रुझ २४
मुंबईतील हवेची गुणवत्ता (सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)
बोरीवली १२४ मध्यम
मालाड १२१ मध्यम
भांडुप ६४ समाधानकारक
अंधेरी ९७ समाधानकारक
बीकेसी १९५ मध्यम
चेंबूर ६८ समाधानकारक
वरळी ९६ समाधानकारक
माझगाव ९९ समाधानकारक