नगरसेवकांना प्रतिक्षा प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 03:09 PM2020-09-02T15:09:47+5:302020-09-02T15:11:03+5:30

कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे गणित कसे मांडायचे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यात आता नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळावा यासाठी नगरसेवकांनी आग्रह धरला आहे. मागील वर्षीचा निधी देखील अद्याप नगरसेवकांना मिळू शकलेला नाही.

Waiting for corporators ward reform and corporator funding | नगरसेवकांना प्रतिक्षा प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधीची

नगरसेवकांना प्रतिक्षा प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधीची

Next

ठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानाबरोबर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला. परंतु ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांना देखील मागील आर्थिक वर्षाबरोबर यंदाच्या आर्थिक वर्षाचा देखील नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी त्यामुळे मिळू शकलेला नाही. कोरोनाच्या संकटात अनेक नगरसेवकांनी प्रभागातील नागरीकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. आता प्रभागातील इतर सोई सुविधांसाठी त्यांना या निधीची गरज असून सध्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे याची विचारणा सुरु झाली आहे.
                    कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. ठेकेदारांची बिले देखील रखडली आहेत. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाची सांगड कशी घालायची याचा पेच पालिकेला सतावत आहे. त्यात आता नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळावा यासाठी नगरसेवक आक्रमक झाले आहे. मागील वर्षीचा देखील निधी अद्यापही नगरसेवकांना उपलब्ध झालेला नाही. मागील काही वर्षात प्रशासन विरुध्द नगरसेवक असा काहीसा वाद असल्याने नगरसेवकांना हे दोनही निधी उशिराने मिळत होते. त्यात मागील वर्षी देखील अर्थसंकल्प उशिराने मंजुर झााल होता. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून अद्यापही नगरसेवकांना हे दोनही निधी मिळू शकलेले नाहीत. त्यात मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील पाच महिने पालिकेची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. त्यातून सावरण्यासाठी पालिकेचा प्रयत्न सुरु आहे.
त्यातही मागील वर्षी नगरसेवकांना निधी कमी असल्याची ओरड नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे नगरसेवकांना वाढीव ७० लाख देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती करुन हा निधी मंजुर करुन घेतला होता. परंतु तो निधी देखील अद्यापही मिळू शकलेला नाही. त्यात यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजुर झाल्यानंतर महासभेच्या पटलावर येऊन वेळेत मंजुर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु कोरोनामुळे अर्थसंकल्प देखील मंजुर होणे शिल्लक आहे. त्यामुळे मागील वर्षीबरोबर नगरसेवकांना यंदाचाही नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी लांबणीवर पडला आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर मिळावा यासाठी नगरसेवक आग्रही झाले आहेत.

या संदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा सुरु आहे. आयुक्तांच्या देखील ही गोष्ट लक्षात आणून देण्यात आली आहे. त्यानुसार नगरसेवकांना हे दोनही निधी लवकरात लवकर मिळतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)

 

Web Title: Waiting for corporators ward reform and corporator funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.