संपता संपेना डिलाइल रोड पुलाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 02:54 AM2019-11-03T02:54:08+5:302019-11-03T02:54:37+5:30
नागरिकांचे हाल कायम । लोअर परळ, दादर, करी रोड, लालबाग येथील वाहतूककोंडीत वाढ
मुंबई : ब्रिटिशकालीन डिलाईल रोड पूल धोकादायक ठरल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आला. परंतु, सव्वा वर्ष उलटले तरी या पुलाची स्थिती ‘जैसे थे’च आहे. पादचाऱ्यांची पायपीट आणि या मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. रेल्वे आणि महापालिकेमार्फत सुरू असलेल्या या पुलाचे काम पूर्ण होण्यास सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या काळात लोअर परळ, दादर, करीरोड आणि लालबाग येथील वाहतुकीला दररोजच्या कोंडीतूनच मार्ग काढावा लागणार आहे.
जुलै २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले पूल कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर मुंबईतील सर्व ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे धोकादायक जाहीर झालेले पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आले. त्या वेळेस जुलै २०१८ मध्ये लोअर परळ येथील डिलाईल रोड पूलही बंद करण्यात आला. हा पूल लोअर परळ, वरळी आणि प्राभदेवी, करी रोड, लालबाग आणि भायखळ्याकडे जाणाºया मार्गांमधील दुवा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. पादचाऱ्यांच्या तक्रारीनंतर येथील धोकादायक भाग बंद करून उर्वरित मार्गावरून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या पुलावर जाण्यासाठी तीन प्रवेश मार्ग आहेत. यापैकी एक करी रोड, दुसरा वरळी आणि तिसरा उत्तर दिशेने आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनुसार महापालिका करी रोडपर्यंतच्या मार्गावरील काम सुरू करणार नाही. या पुलावरील तीन प्रवेश मार्गांच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ९४ कोटी रुपये खर्च आणि २४ महिन्यांचा कंत्राट कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पावसाळ्याचे चार महिने वगळण्यात येत असल्याने २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागातील सूत्रांनी सांगितले.
रेल्वे, महापालिका करणार टप्प्याटप्प्याने काम
च्डिलाइल रोड पूल वाहतुकीसाठी बंद करून अन्य मार्गावरून वाहने वळविण्यात आली आहेत. परळ, दादर टी.टी. पूल आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील पुलांवर वाहतुकीचा भार वाढला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिका आणि पश्चिम रेल्वे टप्याटप्प्यांमध्ये करणार आहे. यापैकी पश्चिम रेल्वेमार्फत रेल्वे रुळांवरून जाणाºया या पुलाचा भाग पाडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. तर उर्वरित काम महापालिका करणार आहे.
च्हा पूल पाडणे आणि पुनर्बांधणी करणे यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये गेल्या वर्षी जुंपली होती. मात्र बराच काळ यावर वाद रंगल्यानंतर महापालिका आणि रेल्वेने आपापल्या हद्दीतील काम करण्याचा निर्णय घेतला. च्पुलाचे काम २४ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र पावसाळ्यातील चार महिने काम बंद ठेवण्यात येत असल्याने प्रत्यक्षात पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी बराच कालावधी जाणार आहे.