मुंबई : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क घेतले जाऊ नये म्हणून मुंबई विभागात आॅनलाइन प्रवेश सुरू केले आहेत. आॅनलाइन प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, चार याद्या जाहीर झाल्या असून, महाविद्यालये सुरू झाली आहेत. अद्याप ३० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसल्यामुळे पाचवी विशेष यादी जाहीर करण्यात येणार आहे. पण, या यादीची तारीख निश्चित नसल्याने विद्यार्थी आता प्रतीक्षेत आहेत.अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना १० महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्जात भरायचा होता. ३० हजारपैकी फक्त अडीच हजार विद्यार्थ्यांचे पहिल्या चार याद्यांमध्ये कुठेच नाव लागले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर, उर्वरित विद्यार्थ्यांचे पहिल्या चार याद्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात नाव लागले होते. पण, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही.प्रवेश न घेण्यामागे महाविद्यालय आवडले नाही, त्यांना हवा असणारा विषय नव्हता तर काहींनी मित्र-मैत्रिणी नाहीत, महाविद्यालय घरापासून लांब आहे अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. मात्र या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश अद्यापही बाकी आहेत.ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर काढण्यात आले. पण, तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसल्याने पाचवी विशेष फेरी राबवण्यात आली. पण, यादी १४ आॅगस्टपर्यंत जाहीर होणार होती. अजूनही यादी जाहीर होण्याची तारीख शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी तारीख कधी जाहीर होईल, याच्या प्रतीक्षेत आहेत. महाविद्यालये सुरू झाली असल्यामुळे लवकर प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
प्रतीक्षा अकरावीच्या विशेष यादीची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:34 AM