नियुक्तीची प्रतीक्षा हीदेखील एक परीक्षाच! एमपीएससी पास होऊन अडीच वर्षे, अद्याप बेरोजगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:07 IST2025-04-12T08:06:10+5:302025-04-12T08:07:43+5:30
MPSC Exam News: राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीतील निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती न मिळाल्याने एमपीएससी उमेदवारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नियुक्तीची प्रतीक्षा हीदेखील एक परीक्षाच! एमपीएससी पास होऊन अडीच वर्षे, अद्याप बेरोजगार
- दीपक भातुसे
मुंबई - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीतील निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती न मिळाल्याने एमपीएससी उमेदवारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आधी जाहिरातीची वाट बघायची, त्यानंतर परीक्षेच्या तारखेची वाट बघायची, मग निकाल आल्यानंतर पुढील सगळे सोपस्कार पार पाडायचे आणि त्यानंतर नियुक्ती कधी मिळेल? याची प्रतीक्षा करायची, अशी ‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अवस्था असल्याचे या प्रशासकीय दिरंगाईवरून दिसून येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या जाहिरातीत दर्शविण्यात आलेल्या पदांपैकी पोलिस उपनिरीक्षक - ३७४ पदांचे प्रशिक्षण बाकी आहे. तर राज्य कर निरीक्षक - १५९ पदे, सहायक कक्ष अधिकारी - ७० पदे यांना नियुक्ती मिळाली आहे आणि सबरजिस्ट्रार - ४९ पदे यांना नियुक्ती मिळाली असून, या उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.
‘एमपीएससी’मार्फत घेण्यात आलेली लिपिक - टंकलेखक भरती २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, परंतु अंतिम गुणवत्ता यादी लवकर जाहीर करण्यात आली तर सात हजारांपेक्षा जास्त उमेदवार पात्र झाले आहेत, त्यांना दिलासा मिळेल.
- महेश घरबुडे, अध्यक्ष,
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
यांची अंतिम यादी नाही
गट-क मधील खालील पदांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. यात लिपिक-टंकलेखक - ७०३५ पदांची सर्वसाधारण निवड यादी जाहीर झाली असून, अंतिम निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही.
कर सहायक - ४६८ पदांची नियुक्ती मिळाली नसून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क - ५ पदे असून, त्यांनाही नियुक्ती मिळालेली नाही.
तांत्रिक सहायक - १ पद असून, याचा निकालच बाकी आहे. अशा ८,१७० पदांची नियुक्ती रखडलेली आहे.