लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला झाला, दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी जाहीर केले, पण अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकलेले नाही. खातेवाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अद्याप चर्चा झालेली नाही.
शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की, आम्हाला कोणती खाती मिळणार याची आम्हाला कल्पना देण्यात आली आहे आणि त्यानुसार शिंदे यांनी कोणाला कोणती खाती द्यायची याची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविली आहे, पण भाजपकडील किमान एक महत्त्वाचे खाते आपल्याला मिळावे या शिंदेसेनेच्या मागणीवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
अजित पवार गटाने अद्याप आपल्या कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यासंबंधीची यादी फडणवीस यांच्याकडे पाठविली नसल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
भाजपची खातेवाटपाची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केली आहे आणि दिल्लीतील पक्षनेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
राज्यमंत्र्यांकडे कोणती खाती?
शिंदे सरकारमध्ये महायुतीतील तीन पक्षांकडे जी खाती होती तीच जवळपास कायम राहतील, मात्र काही बदल होऊ शकतात. तेव्हा सर्व २९ मंत्री हे कॅबिनेट होते. फडणवीस सरकारमध्ये सहा राज्यमंत्री आहेत आणि शिंदे सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नव्हते. त्यामुळे यावेळी तीन पक्षांच्या राज्यमंत्र्यांकडे कोणकोणती खाती राहतील, याचा फॉर्म्युला नव्याने निश्चित करण्यात येणार आहे.
नगरविकास शिंदेंकडे तर वित्त पवारांकडेच?
शिंदेसेनेने गृहनिर्माण, महसूल वा सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते मिळावे, असा आग्रह धरला आहे. नगरविकास खाते हे शिंदे यांच्याकडे तर वित्त खाते हे अजित पवार यांच्याकडेच राहील, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
मंत्री, पण खाते नाही : चार दिवसांपासून मंत्री आहेत पण खाते नाही, अशी मंत्र्यांची अवस्था आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी किंवा उद्याही खातेवाटप जाहीर होईल, असे एक मंत्री म्हणाले.