५० वर्षांपासून घरांची प्रतीक्षा; म्हाडाकडून नवीन इमारतीच्या दुरुस्तीवर लाखोंची उधळपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:45 AM2023-05-01T10:45:41+5:302023-05-01T10:45:53+5:30
३ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी पुन्हा ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि रहिवाशांना ताबाही मिळत नसेल तर, हा सगळा पैसा नेमका जातो कुठे? असा थेट सवाल रहिवाशांनी केला आहे.
मुंबई - म्हाडा प्राधिकरण मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून जवळपास ५० वर्षांपूर्वी पाडण्यात आलेली ३४६-३५२, मौलाना आझाद रोड,१/३/५ भंडार वाडा क्रॉस लेन, गिरगाव येथील इमारत आता खाजगी कंत्राटदार नेमून म्हाडाने नव्याने बांधली आहे.
मात्र सायन येथील प्रतीक्षा नगरातील संक्रमण शिबिरात ५० वर्षे राहणाऱ्या रहिवाशांना अद्याप हक्काचे घर मिळालेले नाही. उलटपक्षी नव्याने बांधलेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी आता नव्याने ३० लाख रुपये खर्च करणार येणार आहेत.
३ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी पुन्हा ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि रहिवाशांना ताबाही मिळत नसेल तर, हा सगळा पैसा नेमका जातो कुठे? असा थेट सवाल रहिवाशांनी केला आहे. गिरगाव येथे २००७ रोजी बांधकाम सुरू करण्यात आलेल्या इमारतीस आज बांधून जवळपास १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. रहिवाशांनी भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
स्थानिकांकडून घुसखोरी
फक्त सहा रहिवासी वर्गास ताबा पत्र देण्यात आले आहे. रहिवासी अजून इमारतीमध्ये राहिला गेले नसल्याने इमारतीमध्ये कित्येक वेळा तेथील स्थानिक नागरिकांकडून घुसखोरी करण्यात आली होती.
२०१८ मध्ये सोडत
विशेष म्हणजे २०१८ मध्ये विनोद घोसाळकर हे म्हाडाचे सभापती असताना म्हाडाकडून इमारतीमधील उपलब्ध असलेल्या रहिवासी वर्गाची सोडत ऑनलाइन पद्धतीने म्हाडा वांद्रे येथील समाज मंदिर हॉलमध्ये सोडत काढण्यात आली.
रहिवासी आजही संक्रमण शिबिरात
इमारतीमधील रहिवासी वर्गाने म्हाडाकडे आपली मूळ कागदपत्रे जमा केली. मात्र कित्येक वर्ष उलटूनही येथील रहिवाशांना आजही संक्रमण शिबिरात राहावे लागत आहे.
काय आहेत मागण्या ?
मृत रहिवासी वर्गास जे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेली अनेक वर्ष वास्तव्य करीत आहेत; त्यांच्याकडून बाँड पेपर घेऊन व त्यांना स्थलांतर द्यावे. ज्या सभासद वर्गाने इमारतीमध्ये घर खरेदी, विक्री केली अशी विशेष बाब म्हणून त्यांच्या कागदपत्रांची योग्य पूर्तता करून त्यांनाही स्थलांतर करून द्यावे.
विविध कामांसाठी ३० लाखांचा निधी
इमारतीमधील ड्रेनेज लाईन, सुरक्षा भिंत, आतील बहुतेक काम करण्यासाठी आणि डागडुजीसाठी ३० लाखांचा निधी मान्य केला. नव्याने बांधलेल्या इमारतींच्या डागडुजीसाठी म्हाडाला ३० लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. दरम्यानच्या काळात इमारतीमधील घरांची दुरवस्था झाली असून, घरांमध्ये साहित्य देखील चोरीला गेले आहे, अशी माहिती इमारतीच्या रहिवासी वर्गाने व सचिव गणेश शिंदे यांनी दिली आहे.