चार पुलांची प्रतीक्षा वाढली
By admin | Published: August 9, 2016 04:19 AM2016-08-09T04:19:48+5:302016-08-09T04:19:48+5:30
रस्ते घोटाळ्यातील दोषी ठेकेदारांवर मेहेरनजर कायम ठेवणाऱ्या पालिका प्रशासनाला अखेर त्यांची कंत्राटे रद्द करावी लागली आहेत.
मुंबई : रस्ते घोटाळ्यातील दोषी ठेकेदारांवर मेहेरनजर कायम ठेवणाऱ्या पालिका प्रशासनाला अखेर त्यांची कंत्राटे रद्द करावी लागली आहेत. उच्च न्यायालयानेच यावर फटकारल्यानंतर स्थायी समितीने मंजूर केलेले चार पुलांच्या कामांचे कंत्राट अखेर रद्द करण्यात आले आहे़ याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला आहे़ मात्र हे कंत्राट रद्द झाल्यानंतर नवीन ठेकेदार मिळेपर्यंत या पुलांचे काम लांबणीवर पडणार आहे़
रस्ते घोटाळ्याप्रकरणात जबाबदार सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई पालिकेने केली़ मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच सहापैकी दोन ठेकेदारांना मुंबईतील चार महत्त्वाच्या पुलांचे कंत्राट बहाल करण्यात आले़ आऱपी़एस़ इन्फ्राप्रोजेक्ट आणि जे़ कुमार या दोन कंपन्यांना या पुलांचे कंत्राट देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीनेही हिरवा कंदील दाखविला़ त्यामुळे हे प्रकरण जनहित याचिकेद्वारे न्यायालयापर्यंत पोहोचले़
अखेर याचा निवाडा न्यायालयाने केल्याने ही कंत्राटे रद्द करण्याचे निर्देश दिले़ त्यानुसार चार पुलांच्या कामांचे कंत्राट रद्द करून नव्याने ठेकेदार नेमण्याची वेळी पालिकेवर आली आहे़ हे कंत्राट रद्द करण्यात येत असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे़ त्यानंतर पुलांच्या कामासाठी
नव्याने ठेकेदाराचा शोध सुरू होणार आहे़ (प्रतिनिधी)
या पुलांची कामे लांबणीवर
हँकॉक पुलासाठी ५५ कोटी १४ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. यारी रोड व लोखंडवाला बँक रोड जंक्शन पुलासाठी ६० कोटी ७४ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. हे काम जे़ कुमार कंपनीला देण्यात आले होते़