कर्जत : कर्जत तालुक्यातील बोरीवली ग्रामपंचायतमध्ये दुर्गम भागात गुडवणवाडी ही चारशे लोकांची वस्ती असलेली आदिवासीवाडी आहे. तेथे पिण्याचे पाणी देण्यासाठी नळपाणी योजना राबविण्यात आली असून वाडीपर्यंत कधीही पाणी योजनेचे पाणी पोहोचले नाही. त्यामुळे तेथील आदिवासी महिलांना तब्बल चार किलोमीटर अंतर खाली डोंगर उतरून चिल्लार नदीवर जावे लागते. एवढी भीषण पाणीटंचाई असताना देखील शासन त्यांना टँकरने पाणी देत नाही.बोरीवली ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९९८ मध्ये नळपाणी योजना राबविण्यास सुरु वात केली. ग्रामपंचायतीमधील उंचावर असलेल्या गुडवणवाडीला देखील या योजनेतून पाणी देण्यात येणार होते. वाडी उंचावर असल्याने तेथे पाणी वेगाने पोहोचावे म्हणून वाडीच्या पायथ्याशी खास पंप बसविण्याचे नियोजन होते. पंप बसविला असून देखील नळपाणी योजनेचे पाणी काही गुडवणवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांना मिळाले नाही. गेली १५ वर्षे ही नळपाणी योजना पूर्ण व्हायचे नाव घेत नाही. तेथे असलेली विहीर जेमतेम फेब्रुवारी महिन्यापर्यंत लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविते. नंतर मात्र आदिवासींना थेंबभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते.वाडीवरून खाली तब्बल चार किलोमीटर अंतरावर गुडवण गावाजवळ या आदिवासी महिला तेथे उन्हाळी कोरड्या असलेल्या चिल्लार नदीमध्ये डवरे खोदून त्यात साठलेले पाणी नेण्यासाठी एकावेळी २५ ते ३० च्या संख्येने एकत्र येतात. दुपारचा उन्हाचा कहर सोडला तर गुडवणवाडी हा रस्ता या महिलांच्या पावलांनी गजबजलेला असतो. दोन हंडे पाणी डोक्यावर वाहून नेण्यासाठी आठ किलोमीटरची पायपीट करावी लागते, तर हंडा डोक्यावर घेऊन कसरत करावी लागत आहे.नळपाणी योजनेचे पाणी वाडीपर्यंत जावे, यासाठी देखील स्थानिक ग्रामपंचायत काहीही करताना दिसत नाही. त्यात जीवन प्राधिकरणाकडून पाणी योजना अपूर्ण असल्याने वर्ग झाली नाही. त्यामुळे गुडवण वाडीतील आदिवासी लोकांची पाण्यासाठी पायपीट कमी होण्याचे नाव घेत नाही. त्याबद्दल कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेचे सचिव सुनील हिंदोळा यांनी शासन दरबारी आवाज उठविला आहे. (वार्ताहर)