एसटी स्थानके ‘जेनेरिक’ औषधांच्या प्रतीक्षेत
By महेश चेमटे | Published: June 24, 2018 07:11 AM2018-06-24T07:11:28+5:302018-06-24T07:11:37+5:30
राज्यातील एसटी स्थानकांवर स्वस्त दरात औषधांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता
महेश चेमटे
मुंबई : राज्यातील एसटी स्थानकांवर स्वस्त दरात औषधांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र अठरा महिन्यांनतरही राज्यातील सर्व एसटी स्थानके जेनेरिक औषधांच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकरणी दोन वेळा निविदा काढून प्रतिसाद न आल्यामुळे महामंडळ तिसऱ्यांदा निविदा काढण्याच्या तयारीत आहे.
केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना स्वत दरात औषधांचा पुरवठा करण्याच्या हेतूने जेनेरिक औषधांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. ही औषधे बाजारातील ब्रँडेड औषधांपेक्षा साधारणत: ४० टक्के कमी दरात विकली जातात. राज्यात एसटी ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखली जाते. यामुळे एसटी स्थानकांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ सर्वसामान्यांना घेता येईल या उद्देशाने प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत राज्यातील ६०८ बस स्थानकांपैकी वापरात असलेल्या ५६८ एसटी स्थानकांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.
२७ डिसेंबर २०१६ मध्ये याबाबत परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि भारत फार्मा सार्वजनिक क्षेत्र यांच्यात स्थानकांवर स्वस्त औषधे दुकान सुरू करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता.
प्रतिसाद नाही
राज्याच्या सर्व एसटी स्थानकांवर जेनेरिक औषधांसाठी दोन वेळा निविदा काढल्या होत्या. महामंडळातील संबंधित विभागाने निविदा काढली होती मात्र प्रतिसादच मिळालेला नाही. या प्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष घालत असून लवकरच तिसºयांदा निविदा काढण्यात येईल.
- दिवाकर रावते,
परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष
अटी-शर्ती अयोग्य
एसटी महामंडळाच्या जेनेरिक औषधांच्या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती अयोग्य आहेत. यामुळे दोन वेळा काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या अटी-शर्ती शिथिल करुन निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी महामंडळाशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.