घराच्या प्रतीक्षेत थाटला फुटपाथवर संसार..
By admin | Published: April 4, 2015 10:37 PM2015-04-04T22:37:11+5:302015-04-04T22:37:11+5:30
नवीन घरात संसार थाटण्याच्या स्वप्नात हक्काचे घर सोडले. विकासकाकडून मिळणाऱ्या तुटपुंजा भाड्यावर भाडेतत्त्वावरील घराचा आसरा घेतला.
मनीषा म्हात्रे- मुंबई
नवीन घरात संसार थाटण्याच्या स्वप्नात हक्काचे घर सोडले. विकासकाकडून मिळणाऱ्या तुटपुंजा भाड्यावर भाडेतत्त्वावरील घराचा आसरा घेतला. पुनर्विकासाच्या नावाखाली पाच वर्षे उलटूनही नवीन घर मिळणे दूरच, तर विकासकाकडून मिळणारे भाडेही बंद झाल्याने ना पहिले जुने घर, ना भाड्याचे घर, ना नवीन घर अशी विचित्र परिस्थिती मुलुंडकरांवर ओढवली. यामुळे काही कुटुंबांना अखेर फुटपाथवर संसार थाटण्याची वेळ आली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील आरएचबी रोडवर असलेल्या कृष्णनगर परिसरात सुमारे ४४ कुटुंबे राहत होती. कालिदास नाट्यगृहासमोर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावर दोन विकासकांची नजर पडली. २००९ मध्ये या नगरातही पुनर्विकासाच्या नावाखाली विकासाचे वारे भिनले. एसआरए योजनेंतर्गत सियान ग्रुपने हा प्रोजेक्ट हाती घेतला. स्थानिकांना सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवीन घराचे स्वप्न दाखवून त्यांंचा विश्वास संपादन केला. यामध्ये एकूण ४४ कुटुंबे बाधित होत होती़ त्यापैकी ३१ कुटुंबे पात्र तर उरलेल्यांना अपात्र ठरवत कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांत झोपडीतून फ्लॅटमध्ये जाण्याच्या स्वप्नात स्थानिकांनी हक्काचे झोपडे सोडले. यापैकी सुरुवातीला विकासकाकडून पहिल्या वर्षी प्रति महिना ४ हजार प्रमाणे प्रत्येकाला ११ महिन्यांचे ४४ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर ६ हजार आणि त्यापाठोपाठ सात हजार प्रति महिन्याप्रमाणे विकासकाडून झोपडीधारकांना भाडे मिळत होते.
बघता बघता इमारत उभी राहण्यास पाच वर्षे उलटली, पण नवीन घराचा ताबा मिळणे तर दूरच़ गेल्या नऊ महिन्यांपासून या झोपडीधारकांना भाडे मिळणेही बंद झाले. हातावर पोट असलेल्या या झोपडीधारकांना घरखर्चाबरोबरच घराचे भाडे देणेही कठीण झाले. यापैकी एक असलेल्या सरगम कुटुंबीयांना तर फुटपाथवर संसार थाटण्याची वेळ ओढावली. कुटुंबप्रमुख शेखर, पत्नी गौरी, मुलगा राजेश आणि राज असे त्यांचे सगळे कुटुंब रामगड परिसरात भाड्याने राहत होते. फुलविक्रीच्या व्यवसायात मिळणाऱ्या पैशातून सरगम घरखर्चाबरोबर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. नवीन घराची आस लावून बसलेल्या या कुटुंबीयांना भाडे मिळणेही बंद झाल्याने घरमालकाने त्यांना घराबाहेर हाकलले. जेवणाची भ्रांत असताना भाडे भरणे त्यांंच्या खिशाला न परडवणारे असल्याने जुन्या घराजवळील फुटपाथवरच त्यांनी गेल्या आठवड्यापासून संसार थाटला आहे.
विकासकाचे घूमजाव
झोपडपट्टीमध्ये पुनर्विकासाचा प्रकल्प राबविण्याच्या पूर्वीच पात्र अपात्रांंची यादी, संबंधित कागदपत्रे दिले असतानाही विकासक झोपडीधारकांकडून कागदपत्रांंची पूर्तता होत नसल्याचे कारण पुढे करून घूमजाव करीत असल्याचे दिसत आहे. सियान डेव्हलपरचे विकासक पांडे यांनी झोपडीधारकांकडून कागदपत्रांंची पूर्तता होत नसल्याने ११ महिन्यांपूर्वी इमारत उभी राहूनही त्यांना ताबा देणे शक्य होत नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. झोपडीधारकांना वेळोवेळी भाडे देण्यात येत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र विकासकाच्या या घूमजावमुळे इमारत अधिकृत की अनधिकृत, असा सवाल स्थानिक उपस्थित करीत आहेत.
फुटपाथवरच परीक्षेची तयारी...
सरगम कुटुंबातील राज हा पी. के. रोड येथील पालिकेच्या शाळेत सहावी इयत्तेत शिकतो. शाळेत परीक्षा सुरू असताना घरमालकाने त्यांना घराबाहेर काढले. या खडतर परिस्थितीतही शिक्षणावर परिणाम होता कामा नये, म्हणून फुटपाथवरच त्याने अभ्यासाला सुरुवात केली. शनिवारी त्याचा गणिताचा पेपर आहे. फुटपाथवरच अभ्यास करीत तो परीक्षेची तयारी करीत आहे.