Join us

वायुवेग पथकाची इंटरसेप्टर वाहनांसाठी प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 5:39 AM

इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार स्पीड गन, ब्रेथ अ‍ॅनालायझर, टिंट मीटर, फायर इस्टिंग्युशर, फर्स्ट रिस्पॉन्ड किट आदींचा समावेश असतो.

मुंबई : परिवहन विभागाने (आरटीओ) वायुवेग पथकासाठी ३८ इंटरसेप्टर वाहनांचा प्रस्ताव वित्त विभागाला मंजुरीसाठी सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वायुवेग पथकाला इंटरसेप्टर वाहनांसाठी करावी लागणारी प्रतीक्षा कायम आहे.इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार स्पीड गन, ब्रेथ अ‍ॅनालायझर, टिंट मीटर, फायर इस्टिंग्युशर, फर्स्ट रिस्पॉन्ड किट आदींचा समावेश असतो. राज्यात मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत रस्त्यावर आरटीओ विभागाची वायुवेग पथके तैनात आहेत. या पथकांची वाहने १० वर्षे जुनी झाली आहेत. कारवाईला गती देण्यासाठी नवीन ३८ इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्यात यावीत, अशी मागणी परिवहन विभागाने केली होती. त्यासाठी एकूण खर्च ६ कोटी ८४ लाख एवढा येईल. याबाबतचा प्रस्ताव यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत सादर केला. परंतु त्याला मंजुरी देण्यास वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला.वायुवेग पथकाच्या तपासणीमुळे अनेक गुन्हे समोर येतात तसेच अपघात रोखण्यास मदत होते. वायुवेग पथकाने २०१८ ते १९ या कालावधीत २,४५,१४२ गुन्ह्यांची नोंद केली असून ३२०.५५ कोटी रुपयांची वसुली केली होती. या वायुवेग पथकातील बहुसंख्य वाहने १० वर्षे जुनी झाली आहेत. ती रस्त्यावर वापरणे धोकादायक आहे. तरीही तात्पुरती दुरुस्ती करून वाहनांचा वापर करण्यात येत आहे. जुन्या वाहनांमुळे अपघात होऊन अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वायुवेग पथकासाठी इंटरसेप्टर वाहने खरेदी करावीत, असे आरटीओ विभागाने प्रस्तावात म्हटले होते.