ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - हुतात्मा स्मारकाराजवळ शपथ घ्यायचीच असेल तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवण्याची घ्या, पारदर्शकतेची कसली घेता, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत कधी येतात, त्याची वाट पाहतोय, असा घणाघात आज मुंबईतील चांदिवलीत झालेल्या शिवसेनेच्या प्रचारसभेत केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई तीर्थप्रसाद म्हणून महाराष्ट्राल मिळालेली नाही, त्यासाठी लढा लढावा लागला. काल भाजपाच्या उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाजवळ पारदर्शकतेची शपथ घेतली. तिथे पारदर्शकतेची कसली शपथ घेता, शपथ घ्यायचीच असेलत तर या हुतात्म्यांनी रक्त सांडून मुंबईसह मिळवून दिलेला संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवण्याची घ्या. आता मुंबईत मोदी कधी येणार याची मी वाट पाहतोय, असे आव्हानही त्यांनी दिले.
मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकू याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. "प्रचारासाठी धावून येणारे कोण आणि मुंबईकरांसाठी धावून येणारे कोण, याचा विचार करा, मुंबईकरांना शिवसेना पाहिजे भाडोत्री माणसे नकोत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
गेल्या मनपा निवडणुकीवेळी शिवसेना संपणार असे विधान करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचा धागा पकडून उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले, ते म्हणाले, "गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की मुंबईत शिवसेना राहणार नाही, पण शिवसेना आहे तिथेच आहे, उलट ती अधिक फोफावलीय, पृथ्वीराज चव्हाण आज कुठे आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचीही तीच गत होणार आहे,"