Join us

एमपीएससी परीक्षांची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी; वयोमर्यादा उलटण्याची उमेदवारांना भीतीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेले काही महिने काेराेनासह विविध ...

वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी; वयोमर्यादा उलटण्याची उमेदवारांना भीती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेले काही महिने काेराेनासह विविध कारणांमुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. गेली दोन वर्षे उमेदवार एकाच परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना सगळी क्षेत्रे हळूहळू पूर्वपदावर येत असताना स्पर्धा परीक्षांबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. या विलंबामुळे वयोमर्यादा उलटण्याची भीती उमेदवारांना आहे. आयाेगाने लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी या उमेदवारांच्या वतीने एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

राज्यसेवेची मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा यांची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई पुण्यासारख्या शहरांत येऊन राहावे लागते. त्यांचा महिन्याचा खर्च कमीत कमी सहा ते सात हजार रुपये असतो. कोरोना काळात सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून, एक-एक दिवस ढकलणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे. त्यातच एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थिनींना आता अभ्यास बंद कर आणि लग्न करून टाक असे सल्ले घरातून मिळत आहेत. त्यामुळे त्या निराश झाल्या आहेत. मागच्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने चार ते पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असे समितीने पत्रात नमूद केले आहे.

* लवकरात लवकर नियाेजन करावे

राज्यात इतर क्षेत्रांतील काेराेना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल केले जात असताना स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर न करणे हे अत्यंत चुकीचे आहे. उमेदवारांचे वय आणि आणि त्यांचा आत्मविश्वास या दोन्हीवर परिणाम होत असून, शासनाने लवकरात लवकर परीक्षांचे नियोजन करावे आणि परीक्षा घ्याव्यात.

- राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती, महाराष्ट्र