लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वन्यजीव दिनाचे औचित्य साधून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय नॅशनल पार्कातील बिबट्या म्हणजे पँथरला दत्तक घेतले. हा दत्तक कार्यक्रम सोमवारी पार पडला. आठवले यांचे सुपुत्र जीत आठवले यांच्या पुढाकारातून बिबट्याला दत्तक घेण्यात आले. यावेळी बिबट्याचे नाव ‘भीम’ असे ठेवण्यात आले. बिबट्याच्या वर्षभराचा खर्च दहिसर तालुका रिपाईतर्फे १ लाख २० हजारांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. बिबट्या दत्तक घेण्याचा कार्यक्रम दहिसर तालुका आरपीआयचे अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी आयोजित केला होता. यावेळी आठवले म्हणाले की, मी स्वत: दलित पँथर संघटनेतून पुढे आलो. त्यामुळे बिबट्या दत्तक घेणे हा दलित पँथर संघटनेविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. तसेच शिवसेनेचा टायगर आणि आरपीआयचा पँथर राजकीय जंगलात एकत्र आल्यावर संपूर्ण जंगलावर राज्यस्थापन करु शकतो याची प्रचिती शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या महायुतीतून आम्ही दाखवून दिले आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय नॅशनल पार्कामध्ये २६ डिसेंबर २०१६ पासून प्राण्यांना दत्तक घेण्याची योजना सुरु झाली. दत्तक योजना राबविण्याचा थेट संबंध कर्नाटक राज्यातील बनेरगट्टा बॉयोलॉजिकल पार्क येथे राबविण्यात आलेल्या वन्यप्राणी दत्तक योजनेच्या धर्तीवर आधारित आहे. नॅशनल पार्कामध्ये २०१४ सालापासून प्राण्यांना दत्तक घेतले जाऊ लागले. यामध्ये सिंह, पांढरा वाघ, वाघ, बिबट, वाघाटी, चितळ आणि भेकर यांना दत्तक घेण्यात आले आहे. परंतू निलगायी अजून पालकांच्या शोधात आहेत. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक असलेल्या प्राण्यांना सगळेच दत्तक घेतात. पण निलगायींना कोणी दत्तक का घेत नाही ? असा प्रश्न प्राणी मित्रांनी उपस्थित केला आहे.
नॅशनल पार्कमधील नीलगायी पालकांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 16, 2017 1:07 AM