उत्पन्न ठप्प, खर्चात मात्र वाढ
खलील गिरकरमुंबई : दिवसभर विविध वाहनांच्या टायरचे पंक्चर काढून घरखर्चासाठी उत्पन्न मिळवणाऱ्या मुन्ना भाई पंक्चरवाल्याला आता हे लॉकडाऊनचे खडतर दिवस कधी एकदाचे संपतील याची प्रतिक्षा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे जीवन इतरांच्या तुलनेत अधिकच खडतर झाले आहे. लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद झाल्याने दररोज नियमितपणे येणारे उत्पन्न ठप्प झालेले आहे. मात्र उत्पन्न ठप्प झालेले असले तरी खर्चावर मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. उलट विविध वस्तुंच्या किंमती वाढल्याने खर्चात नेहमीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा या विवंचनेत मुन्नाभाई पडले आहेत. लॉकडाऊन लवकर समाप्त झाले तर किमान घरखर्चाला लागणारे उत्पन्न तरी घेता येईल व डोक्यावर असलेले आर्थिक संकट काहीसे कमी होईल, अशी त्यांची भावना आहे.
दिवसभर पंक्चर काढून त्याद्वारे मिळणाऱ्या पैशातून घर चालवणाऱ्या नजीबुद्दीन शेख (मुन्ना भाई पंक्चरवाले) यांना देशात अशा प्रकारे लॉकडाऊन होईल याची फारशी पूर्वकल्पना नव्हती. काही प्रमाणात बंधने असली तरी आपला व्यवसाय मात्र सुरु राहील व उत्पन्न सुरु राहील असा त्यांचा अंदाज होता. मात्र त्यांचा हा अंदाज सपशेल चुकला व आता त्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. गेल्या तीस वर्षांपासून पंक्चर काढण्याचे काम करणाऱ्या मुन्ना भाईंच्या घरात त्यांची पत्नी, दोन मुले, एक मुलगी व त्यांच्यासोबत राहणारा एक पुतण्या असा सहा जणांचा संसार आहे. मुलगी महाविद्यालयात शिकत आहे तर मुले व पुतण्या शालेय शिक्षण घेत आहेत. घरात त्यांच्याशिवाय कमावणारी दुसरी व्यक्ती नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीविषयी चिंता वाटू लागली आहे.उत्पन्न पूर्णपणे बंद झाल्याने पुढील दिवस कसे जाणार याची त्यांना काळजी लागली आहे. जोपर्यंत काम सुरु होत नाही तोपर्यंत ही अडचण सुरुच राहणार असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याने व घरात बसून कंटाळल्याने पंक्चरचे काम करण्याची परवानगी त्यांनी पोलिसांकडे मागितली होती मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच कामाची परवानगी आहे. त्यामुळे त्यांना घरात बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उत्पन्न बंद झालेले असले तरी घरातील सर्व कुटुंबियांचा दिवसाचा खर्च कायम आहे. त्यातच दुकाने बंद असल्याने व जीवनावश्यक वस्तुंची, किराणा मालाची वाहतूक कमी झाल्याने जी दुकाने सुरु आहेत त्यामधील वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा त्यांना जास्त रक्कम खर्च करावी लागत आहे.घराचे वीजेचे बिल, गॅस खर्च, खाण्यापिण्याचा खर्च हा सुरुच असून तो टाळणे शक्य नसल्याने त्यांची कुतरओढ होऊ लागली आहे. पंक्चर काढण्यासाठी ते वापरत असलेल्या जागेचे भाडे दरमहा साडेतीन हजार रुपये आहे. हे भाडे रद्द करण्याबाबत मालकांनी अद्याप काही सांगितलेले नाही. त्यामुळे उत्पन्न बंद झालेले असले तरी त्यांना दुकानाचे भाडे देणे बंधनकारक आहे. हे भाडे रद्द व्हावे अशी त्यांची मागणी आहे. मात्र अद्याप त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
चाळीत स्वमालकीचे घर असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळून छोट्याश्या घरात चौवीस तास राहणे इतरांप्रमाणे त्यांच्याही जीवावर आले आहे, मात्र काहीही पर्याय उरलेला नसल्याने त्यांना घरात बसून राहण्याऐवजी गत्यंतर उरलेले नाही. गेल्या तीस वर्षापासून या क्षेत्रात काम करत असले तरी दररोज कमवायचे व तेच पैसे घरखर्चाला वापरायचे असा त्यांचा आजपर्यंतचा शिरस्ता आहे त्यामुळे फारशी काही बचत उरलेली नाही. जी काही थोडीफार बचत आहे त्यावर सध्या आला दिवस पुढे ढकलायचे असे प्रकार सुरु आहेत. इतक्या वर्षात पहिल्यांदाच या प्रकारे परिस्थिती उद्भवल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर दूर व्हावी अशी प्रार्थना करत ते आला दिवस ढकलत आहेत.