‘अनुभूती’ची प्रतीक्षा लांबली, ‘विस्टाडोम’मुळे विलंब, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज बोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:03 AM2017-09-15T07:03:04+5:302017-09-15T07:03:19+5:30
पारदर्शी टूरिस्ट स्पेशल ‘विस्टाडोम’ बोगीमुळे हाय-लक्झरी ‘अनुभूती’ बोगीची प्रतीक्षा लांबल्याची माहिती समोर येत आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम बोगी जोडण्यात येणार आहे. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटे ५.२५ वाजता ही एक्स्प्रेस दादर येथून सुटणार आहे. तर मडगावला ही एक्स्प्रेस ४ वाजता पोहोचणार आहे.
- महेश चेमटे
मुंबई : पारदर्शी टूरिस्ट स्पेशल ‘विस्टाडोम’ बोगीमुळे हाय-लक्झरी ‘अनुभूती’ बोगीची प्रतीक्षा लांबल्याची माहिती समोर येत आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम बोगी जोडण्यात येणार आहे. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटे ५.२५ वाजता ही एक्स्प्रेस दादर येथून सुटणार आहे. तर मडगावला ही एक्स्प्रेस ४ वाजता पोहोचणार आहे. पावसाळ्यातील कोकण घाटातील हिरवाई अनुभवण्यासाठी विस्टाडोम डबा जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. परिणामी विस्टाडोममुळे अनुभूतीची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे.
आधुनिक आणि प्रगत अशी अनुभूती बोगी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) तयार झाली आहे. या बोगीसाठी पश्चिम रेल्वेवरील राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसचे नाव जवळपास निश्चित करण्यात येत आहे. लिंके-हॉफमॅन-बुश (एलएचबी) प्रकारात अनुभूती बोगीची निर्मिती करण्यात आली आहे. अनुभूती बोगीत ५६ आसने असणार आहेत. आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एलसीडी स्क्रीन, वैयक्तिक मोबाइल चार्जिंग अशी सुविधा देण्यात आली आहे. बोगीच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन असून यात जीपीएस तंत्रज्ञानाने ‘रिअल टाइम’नुसार गंतव्य स्थान, येणाºया स्थानकास लागणारा वेळ, प्रवासाचे अंतर हे दिसणार आहे. या बोगीत प्रथमच सेन्सरयुक्त शौचालय कार्यान्वित करण्यात आले आहे. अनुभूतीच्या बोगींना अॅन्टी-ग्राफिटी रंग देण्यात आला आहे. अशा पद्धतीने रंगवण्यात येणारी अनुभूती ही पहिलीच बोगी आहे. या प्रत्येक बोगीची किंमत सुमारे ३.५० कोटी रुपये आहे. अनुभूती बोगीची तरतूद रेल्वे बजेटमध्ये केल्यानंतर तब्बल चार वर्षांनी अनुभूती बोगी भारतीय रेल्वेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.
यंदाच्या वर्षात फक्त १० बोगी
पश्चिम रेल्वेच्या शताब्दी किंवा राजधानी एक्स्प्रेसच्या माध्यमाने अनुभूती प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्रवास या उद्देशाने ही बोगी तयार करण्यात आली आहे. यामुळे या बोगीचे प्रवासी भाडे वातानुकूलित चेअर आणि एक्झिक्युटिव्ह चेअर यांच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तवली आहे. यंदाच्या वर्षात फक्त १० बोगी तयार करण्यात येणार आहेत. परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तूर्तास तरी प्रवासासाठी अनुभूती येणार नाही, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.