Join us

नवीन पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 5:22 AM

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जोडणारा हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे शेकडो प्रवासी व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जोडणारा हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे शेकडो प्रवासी व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी चार बैठकांमध्ये अडीच हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करणाऱ्या महापालिकेने नवीन पुलाबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.दादाभाई नौरोजी मार्गावरील पादचारी पूल गुरुवारी संध्याकाळी कोसळून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३१ नागरिक जखमी झाले. या पुलाचा ६० टक्के भाग कोसळल्यामुळे हा पूल आणखी धोकादायक बनला होता. यामुळे महापालिकेने पुलाचा उर्वरित भाग पाडून लोखंडी सांगाडाही काढला. त्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या दुर्घटनेला चार दिवस उलटूनही या जागेवर नवीन पादचारी पूल बांधण्याबाबत अद्याप कोणत्या हालचाली झालेल्या नाहीत.मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सध्या फलाटावर पोहोचण्यासाठी दक्षिणेकडील भुयारी मार्गाचा वापर करावा लागत आहे. तर काहीजण हा वळसा टाळण्यासाठी दुभाजकावरूनच उड्या मारत आहेत. परंतु नवीन पूल बांधण्याचा निर्णय झाला, तरी काम पूर्ण होण्यास सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल, असे पूल खात्यातील सूत्रांनी सांगितले.तेव्हा येथे नवीन पूल कधी उभारण्यात येईल, असा प्रश्न दैनंदिन प्रवाशांना पडला आहे़ या पुलावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे़भुयारी मार्गातील गर्दी वाढणार...दादाभाई नौराजी रोड हा गजबजलेला मार्ग आहे. या मार्गावरून वाहतूक सतत सुरूच असल्याने अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून पादचारी पूल वापरण्यावर भर देण्यात येत होता. १९८४ मध्ये बांधलेला हा एकमेव पादचारी पूल होता. यामुळे फोर्ट, चर्चगेट, कुलाबा व सीएसटी येथील सरकारी व खासगी कार्यालयातील कर्मचारी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी या पुलाचा वापर करीत होते. परंतु पूल नसल्यामुळे व दुभाजकावरुन रस्ता ओलांडणे धोकादायक असल्याने लोकांना आता भुयारी मार्गाचा वापर करावा लागत आहे. फेरीवाले व प्रवाशांनी गजबलेला असल्याने भुयारी मार्गावर ताण वाढणार आहे. 

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल